नाशिक – महाराष्ट्रात एकाच वेळी जळगाव, नाशिक, नंदूरबार, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, परभणी, जालना, बुलढाणा, वाशीम, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा आदी अनेक जिल्ह्यात साधारणत: सायंकाळी पावणे आठच्या सुमारास म्हणजे शेकडो किलोमीटर क्षेत्रात तसेच विशेषत: विविध दूरदूरच्या जिल्ह्य़ात एकाचवेळी जमिनीला समांतर जाणारे प्रकाशाचे गोळे नागरिकांनी पाहून चर्चाना उधाण आले होतेतर काहीजण घाबरले देखील होते.मात्र ही नैसर्गिक भौतिकशास्त्रीय घटना असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवा पसरवू नये असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी या शास्त्रीय घटनेचा अभ्यास व वैज्ञानिक विश्लेषण केले आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी संपूर्ण महाराष्ट्रात दिसणाऱ्या ‘बाॅल लायटनिंग’ हा एक अनोखा व कोरड्या वातावरणात प्लाझ्मा तयार होत घडणारा सायंटिफिक फेनामेनाॅन आहे. तर चंद्रपूरपासून १०० किमी अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्का कोसळल्याची चर्चा आहे. या ठिकाणी आकाशातून मोठी लोखंडी रिंग पडल्याची चर्चा आहे. तो पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह असू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे मात्र त्याचा महाराष्ट्र भर दिसणाऱ्या बाॅल लायटनिंग शी संबंध नसून ती पुर्णपणे दुसरी वेगळी घटना आहे असे शास्त्रीय विश्लेषण देखील भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी सह अनेक ठिकाणी बाॅल लायटनिंग म्हणजे विजेचे गोळे दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान उपग्रहाचे भाग तसेच उल्का कोसळत असताना त्या वरून खाली कोसळतात. मात्र अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये ही कैद केलेल्या नैसर्गिक घटना या स्पष्टपणे बाॅल लायटनिंग च्या असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. सध्या याबाबत फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी याला एलियनची तबकडी, उल्का, उपग्रहाचे तुकडे असे विविध ‘मिर्चमसाला’ लावत बातम्या चर्चिल्या जात आहे. मात्र महाराष्ट्रात ‘बाॅल लायटनिंग’च्या घटना हा एक अनोखा व कोरड्या वातावरणात प्लाझ्मा तयार होत घडणारा ‘सायंटिफिक फेनामेनाॅन’ आहे असे आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शास्त्रीय माहिती जाणून घेतली. याबाबत भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) पुणेचे माजी हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी बाॅल लायटनिंग अर्थात विजेच्या गोळ्यांबाबत दिलेली शास्त्रीय माहिती पुढीलप्रमाणे आहे.
(‘बाॅल लायटनिंग’ चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा)
Watch “आकाशातील ती घटना म्हणजे बॉल लायटनिंग ,हवामान शास्त्रज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांचा दावा”
त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये सध्या बाॅल लायटनिंग च्या घडणार्या घटना या पुर्णपणे नैसर्गिक असून नागरीकांनी घाबरु नये. क्षितीज समांतर जाणारे विजेचे गोळे म्हणजे बाॅल लायटनिंग हा एक आकाशातून पडणाऱ्या विजांचा प्रकार असून. उल्का किंवा उपग्रहाचे तुकडे हे वरून खालच्या दिशेला पडतात आणि संपुर्ण महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर दूर क्षितिज समांतर प्रवास करु शकत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले.
विशेष म्हणजे २००२ साली देखील उत्तर प्रदेश मध्ये अशा प्रकारे बाॅल लायटनिंग म्हणजे विजेचे गोळे दिसले होते. आणि २० वर्षांपूर्वी देखील प्रा.जोहरे यांनी उत्तर प्रदेश मध्ये याबाबत शास्त्रीय अभ्यास केला होता. बाॅल लायटनिंग च्या या घटना त्यावेळी ‘मुंहनोचवा’ म्हणून ओळखल्या जात व घबराट निर्माण झाली होती. मुंहनोचवा घडलेला प्रकार हा बाॅल लायटनिंगचे विज्ञान आहे. त्यावेळी निसर्गाची अजब करामत म्हणजेच ‘बॉल लायटनिंग’ अनेकांच्या चेहरांवर रेघोट्या ओढल्या गेल्याने ते घायाल झालेत, लोकांवर हल्ला करीत घबराट पसरविण्या मागे ‘मुंहनोचवा’ म्हणजे ‘बॉल लायटनिंग’चे विजेचे गोळे होते हे अद्भुत आणि तितकेच रंजक वैज्ञानिक वास्तव आहे अशी माहिती देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.
‘बॉल लायटनिंग’ हा विजांचा प्रकार आणि त्यामुळे विजेच्या प्रभाव दाखवित घडणाऱ्या घटना पुर्णपणे भौतिकशास्त्रीय घटना होय. सर्वसामान्य व्यक्तीला ‘बॉल लायटनिंग’ या रहस्यमयी, रंजक आणि नैसर्गिक विजेच्या प्रकारा बद्दल क्वचितच माहिती असते. ‘बॉल लायटनिंग’ ही एक वैज्ञानिक अद्भुत घटना आहे. ‘बॉल लायटनिंग’ म्हणजे आकाशातून जमिनीवर पडणारे विजेचे चेंडू किंवा गोळे होय. ‘बॉल ऑफ फायर’ किंवा ‘फायर बॉल’ या नावाने ही ते ओळखले जातात. कधी कधी वाटाण्याच्या दाण्या पासून काही मीटर परीघाचे तर कधी टेनिस बॉलच्या आकारापासून फुट बॉलच्या आकारापर्यंत ‘बॉल लायटनिंग’चे सुर्यासारखे तत्प असे हे ‘तेजोमय विद्युत गोळे’ क्षणात क्षितिज समांतर तर कधी तिरपे किंवा उभे धावतांना दिसतात अशी वैज्ञानिक माहिती देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.
कधीकधी काहीही इजा न पोहचविता व्यक्तीचा पाठलाग करते, त्या व्यक्तीच्या डोक्यावर गोल-गोल फिरते आणि फट् आवाज करीत साबणाच्या फुग्या प्रमाणे फुटत वातावरणात दुर्गंधी पसरवून ‘बॉल लायटनिंग’चे हे चेंडू गायब होतात असे ही त्यांनी सांगितले. काच, लाकूड, भिंत, धातूचे पत्रे यांना न तोडता ‘बॉल लायटनिंग’चे हे चेंडू आरपार जावू शकतात अशा शेकडो घटनां ऐकल्या तर आश्चर्य वाटते. अद्यापही यामागचे विज्ञान आपल्याला कळालेले नाही याची जाणीव होते. वातारणाच्या कुशीत निळे, जांभळे, लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे, पारदर्शक आदी रंगछटांचे ‘विजेचे चेंडू’ जगभर उड्या मारत अ-वैज्ञानिक करामती दाखवित असतात. कधी क्षणात अदृश्य होतात. कुणाला ‘बॉल लायटनिंग’ परग्रहावरच्या प्राणांच्या करामती वाटतात असे ही प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
विजा जेव्हा वाळू किंवा जमिनीवर पडतात तेव्हा भुईनळ्याच्या दाण्या प्रमाणे उडी मारत पळणारे ‘बॉल लायटनिंग’ म्हणजेच विजेचे गोळे लोकांनी जसे पाहिले आहेत. अगदी तसेच ‘विजेचे गोळे’ प्रयोगशाळेत देखील बनविण्यात काही संशोधकांनी यश मिळविले आहे असे ही ते म्हणाले.‘बॉल लायटनिंग’ हा विजांचा दुर्मीळ प्रकार असून, आयुष्यात व्यक्तीला एकदा ‘बॉल लायटनिंग’ दिसण्याची शक्यता ०.०१ टक्के इतकी कमी आहे. जानेवारी २०१४ मध्ये ‘बॉल लायटनिंग’चा खराखुरा व्हिडीओ जगभर प्रसारित झाला होता. आकाशातून प्लाझ्माचे पडणारे धगधगते गोळे म्हणून ही ‘बॉल लायटनिंग’ चे वर्णन केले जाते. १७५३ मध्ये रशियन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज विल्यम रिचमन ह्याने प्रयोगासाठी बसविलेल्या धातूच्या सळई मधून फिक्कट निळ्या रंगाचा विजेचा चेडू बाहेर पडून तो डोक्याला चिटकल्याने त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागलेत असे ही त्यांनी सांगितले.
याआधी ३० एप्रिल १८७७ रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ‘बॉल लायटनिंग’ प्रकट झाल्याचे जनसमुदायाने पाहिले अशी देखील अधिकृत नोंद आढळते. तसेच वाहनांना आणि शेतांना आगी लावतांना हे विजेचे लोळ स्फोट देखील घडवितात. परिणामी शॉर्टसर्किटने अपघाताच्या बातम्या झऴकतात. ‘बॉल लायटनिंग’च्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. शेकडो वर्षांच्या दहा हजारपेक्षा जास्त नोंदी असलेल्या ‘बॉल लायटनिंग’मुळे १९६० नंतर संशोधकांचे दोन गट पडले आहेत. एक गट विजेचे गोळे पडतात यावर विश्वास ठेवतो आणि अभ्यास करीत शोध घेतो आहे. तर दुसरा गट भौतिकशास्त्राच्या नियमांना बासनात गुंडाळून टाकते त्यामुळे ‘बॉल लायटनिंग’ च्या घटनांवर विश्वास ठेवत नाही असे देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
तसेच १९ मार्च १९६३ रोजी न्युयॉर्क ते वॉशिंगटन जाणार्या फ्लाइट ईए ५३९ मध्ये अचानक २० सेटीमीटर व्यासाचा विजेचा चेंडू पायलटच्या केबीन कडून विमानत मध्यावर दाखल झाल्याची ‘बॉल लायटनिंग’ची अधिकृत नोंद आहे. विजेच्या तारा, खांब, मीटर, ट्रान्सफॉर्मर, लायटनिंग अरेस्टर आदी ‘बॉल लायटनिंग’ची आकर्षण केंद्र होत.सध्या याबाबत बरेच संशोधन सुरू असले तरी ‘बॉल लायटनिंग’ च्या विक्षिप्त आचरण मागचे गुढ अद्द्याप उकललेले नाही. एक दिवस ‘बॉल लायटनिंग’चे कोडे उलगडण्यास अजून प्रचंड वाव आहे. विज्ञान नक्की उलगडेल आणि या विज्ञानाचा वापर मानवी सभ्यता, संस्कृती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी ब्रम्हांडाच्या क्षितिजांना पादाक्रांत करतांना नक्की होईल अशी आशा आहे. पण तोपर्यंत तरी असेच म्हणावे लागेल की, “बॉल लायटनिंग: एक अनसुलझी गुत्थी!” अशी शास्त्रीय माहिती देखील आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे हे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) चे माजी शास्त्रज्ञ असून त्यांनी १२ वर्षेपेक्षा जास्त काळ विजांवर संशोधन केले आहे. बाॅल लायटनिंग घटनांमुळे नागरिकांनी उगीचच घाबरुन जाऊ नये व अफवा पसरवू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेला केले आहे.
https://youtube.com/shorts/78dm4rV-sMM?feature=share