नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीला नवा आयाम‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’

२४ तास अभिजात संगीत आणि कलासंस्कारांचा महासोहळा ३ व ४ जानेवारीला

0

नाशिक, दि. २९ डिसेंबर २०२५Nashik Events नाशिक शहराची स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण आणि कायमस्वरूपी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ हा अभूतपूर्व उपक्रम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिककरांच्या भेटीला येत आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत, सलग २४ तास गंगापूर रोडवरील बालाजी मंदिरात हा अनोखा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे.सतत २४ तास अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत सेवा आणि त्यासोबत विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून संस्कृती जतन व संवर्धन करण्याचा संकल्प म्हणजेच ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’. ही संकल्पना आता नाशिक शहराची नवी ओळख ठरणार आहे.

पुष्पयात्रेने होणार मंगलारंभ (Nashik Events)

या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असलेली पुष्पयात्रा शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. नियोजित रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिला काळाराम मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ एकत्र येणार आहेत. तेथून दुचाकीवरून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, आर.के. परिसर, सुश्रुत बंगला (रेड क्रॉस नंतर) आणि काँग्रेस भवन मार्गे ही पुष्पयात्रा पुढे जाणार आहे. या मार्गावर कल्याणी पतसंस्थेच्या महिलांकडून ओवाळणी, तर मेहर सिग्नल, अशोक स्तंभ आणि प्रसाद सर्कलजवळील डॉ. रणजीत जोशी यांच्या हॉस्पिटलजवळ स्वागत करण्यात येणार आहे. बारदान फाटा सिग्नलमार्गे एका रांगेत सर्व महिला बालाजी मंदिरात पोहोचून आरती व पुष्पांजली अर्पण करतील.

‘चारचौघं’ आणि विनायक रानडे यांची दूरदृष्टी

ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचन चळवळीच्या माध्यमातून देशभरात संस्कारक्षम उपक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर, सर्वश्री विनायक रानडे यांनी ‘चारचौघं’ या विचारमंचाच्या सहकार्याने ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ ही संकल्पना साकारली. २०२३, २०२४ आणि २०२५ नंतर २०२६ हे या उपक्रमाचे चौथे यशस्वी वर्ष ठरणार आहे.

आजवर “नाशिकची स्वतःची अशी सांस्कृतिक ओळख नाही” अशी टीका करणाऱ्यांना उत्तर देणारा हा ‘न भूतो न भविष्यती’ असा कार्यक्रम ठरला आहे. पौराणिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक वारसा आणि निसर्गसंपन्नता लाभलेल्या नाशिकला, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज आणि वसंतराव कानेटकर यांच्या परंपरेचा वारसा लाभला आहे. नाटक, सिनेमा आणि साहित्य या कलांची परंपरा पुढील पिढीने जपली असून, त्याच परंपरेतून ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ हा प्रयोग आकाराला आला आहे.

८ प्रहर, १० थाट आणि २४ तासांची संगीतसाधना (Nashik Events)

भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात नाशिकची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, या विचारातून या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.

२४ तास ८ प्रहर १० थाट

दिवसाचे चार प्रहर

६ ते ९ पूर्वान्ह

९ ते १२ मध्यान्ह

१२ ते ३ अपरान्ह

३ ते ६ सायंकाळ

रात्रीचे चार प्रहर

६ ते ९ प्रदोष

९ ते १२ निशिथ

१२ ते ३ त्रियाम

३ ते ६ उषा

या आठ प्रहरांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे दहा प्रमुख थाट बिलावल, कल्याण, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, भैरवी आणि तोडी यांचे सुसंगत सादरीकरण केले जाणार आहे.संगीत पंडितांशी सखोल चर्चा आणि संशोधनानंतर विनायक रानडे यांनी हा प्रयोग प्रत्यक्षात आणला. सिएल कुलकर्णी, एन.सी. देशपांडे, समीर देशपांडे आणि संजय कंक या चौघांच्या सहकार्याने नाशिकमधील ज्येष्ठ, अनुभवी आणि नवोदित गायक-वादकांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक प्रहरासाठी स्वतंत्र निवेदकांची नियुक्ती करण्यात आली असून सलग चौथ्या वर्षीही ही परंपरा कायम आहे.

संगीतासोबत संस्कारक्षम कला आणि पुढील पिढीसाठी वारसा

अष्टौप्रहर स्वरहोत्र’ हा केवळ संगीत महोत्सव नसून, तो संस्कारक्षम कलांचा महासंगम आहे. या निमित्ताने श्रीसुक्त अर्चन, गीतापठण, रामनाम जप, गंधसेवा, सुलेखन, दर्पण प्रतिमा सुलेखन, शिल्पकला, कापूस शिल्प, चित्रांजली, बाल चित्रांजली, वस्त्र चित्रांजली, म्युरल, अमूर्त चित्रकला, रांगोळी, पॉटरी, शास्त्रीय नृत्य, शंखनाद आणि बालाजी अष्टवर्ण दिव्य मंडला अशा विविध कलांचा आविष्कार सादर होणार आहे.तज्ज्ञ कलाकारांसोबतच विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याने, शिक्षक-विद्यार्थी परंपरेचा अनुभव आणि विविध कलांची ओळख पुढील पिढीला मिळणार आहे. शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हा संपूर्ण उपक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

नाशिककरांसाठी अभिमानाचा क्षण

अभिजात संगीत, अध्यात्म, कला आणि संस्कृती यांचा संगम साधणारा ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ हा उपक्रम नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिककरांना ही अद्वितीय अनुभूती घेण्याची संधी मिळणार असून, नाशिकची ओळख आता ‘अभिजात संगीताची राजधानी’ म्हणून अधिक ठळकपणे पुढे येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

असे असणार कार्यक्रम

Nashik Events,A new dimension to Nashik's cultural identity: 'Ashtaoprahar Swarhotra'

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!