दसककर संगीत साधक परिवारातर्फे ‘स्वरतीर्थ’चा अनोखा संगीत सोहळा!

आजचे विशेष आकर्षण

1

नाशिक, दि. ८ नोव्हेंबर २०२५ Nashik Events महाकवी कालिदास कलामंदिर येथे दसककर संगीत साधक परिवाराच्या वतीने आयोजित ‘स्वरतीर्थ’ या संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राने रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. शास्त्रीय, लोकसंगीत, फ्युजन आणि हार्मनीचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमाने नाशिककर रसिकांना एक अविस्मरणीय संगीतयात्रा अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात दसककर भगिनी अश्विनी, कल्याणी, ईश्वरी, गौरी, सुरश्री व त्यांच्या शिष्यवर्गाच्या सुरेल नांदीने झाली. शास्त्रीय बंदिशी, सरगमगीत, तराणा, चतुरंग अशा विविध संगीतप्रकारांची सादरीकरणे रंगली. ईश्वरी दसककर कदडी यांची रचना असलेली आडा चौतालमधील अनोखी मल्हारमाला ही रचना विशेष दाद मिळवणारी ठरली.

यानंतर झुलू भाषेतील सियाहंबा वरील हार्मनी, दरबारी कानडातील लयकारी आणि रागमालेतील सुमधुर आलापी यांचा संगम झाल्याने सभागृहात रसिक मंत्रमुग्ध झाले. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. सुभाष दसककर व त्यांच्या शिष्यवर्गाने सादर केलेला राग झिंजोटी वादन आणि सिम्फनी स्टॉर्म ने कार्यक्रमाला वेगळेच परिमाण दिले.

ईश्वरीजींची रचना असलेला जोगकंस रागातील तराण्यावरील फ्युजन हार्मनी आणि वाद्यांशिवाय वोकल हार्मनीमधील टर्किश मार्च सिम्फनी हे प्रयोग रसिकांसाठी आगळेवेगळे ठरले. ४ वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंत वयोगटातील साधकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सुमारे ६० लहान विद्यार्थ्यांनी एकत्र सादर केलेले मंगल भवन, रामस्तुती आणि महाबली महारुद्र या भक्तिगीतांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले.

पहिल्या सत्राचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीते, इंद्रजिमी जंभपर आणि रणी निघता शूर यांसारख्या देशभक्तीपर अभंगांनी झाला. या सादरीकरणाने प्रेक्षक भावविव्हल झाले आणि सभागृहात देशभक्तीचा उत्साह उसळला.

संगीत साधनेसाठी संवादिनीवर पं. माधव दसककर, पं. सुभाष दसककर, अश्विनी, कल्याणी, ईश्वरी, गौरी, सुरश्री दसककर भगिनी यांनी साथ दिली. सिंथेसायझरवर ईश्वरी व सुरश्री गौरी दसककर, मल्हार भार्गवे, आर्या सारडा, निहार देशमुख यांनी तर तबलासंगत सुजित काळे, चैतन्य दसककर, ओंकार अपस्तंब, सारंग तत्ववादी यांनी केली. ऑक्टोपॅडवर अभिजीत शर्मा, शुभम जाधव आणि तालवाद्य संगती अमित भालेराव यांनी केली.

प्रकाश व ध्वनी योजना, LED वॉल व तांत्रिक संयोजनामध्ये अमेय भार्गवे, राघवेंद्र कदडी, सचिन तिडके, मोहित चौधरी यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि मानसशास्त्रज्ञा डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव मारुलकर, तसेच नामवंत संगीततज्ञ, कवी, लेखक, अभिनेते आणि पत्रकारांची उपस्थिती लाभली.

आजचे विशेष आकर्षण :

नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारीया वेळेत स्वरतीर्थचे दुसरे सत्र रंगणार आहे. यावेळी ज्येष्ठ संगीततज्ञा गुरू विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सत्कार सोहळा होणार आहे. तसेच लोकगीते, भजन, अभंग, थाटमाला, प्रेरणागीत आणि विविध वाद्यसंगतीचा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.‘स्वरतीर्थ’च्या या सत्राने नाशिकच्या संगीत परंपरेला नवचैतन्य दिले असून, शास्त्रीय संगीताच्या नव्या पर्वाची सुरुवात केल्याची भावना रसिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!