Nashik : ‘पुष्पोत्सव २०२३’चे मोठ्या उत्साहात उद्घाटन
फुले, झाडांच्या प्रदर्शनाने नाशिककर आनंदीत : सेल्फी पॉईंटला प्रतिसाद : २५ आणि २६ मार्चला कार्यक्रमांची मेजवानी
नाशिक,दि.२४ मार्च २०२३ – नाशिक महानगरपालिकेचा उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजीत ‘पुष्पोत्सव २०२३’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात आज दि. २४ मार्च रोजी झाले. सुरुवातीला सायक्लोन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी गीत सादर केले. लताताई धुमाळ यांनी स्वागत गीत म्हटले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी प्रास्ताविक करून पुष्पोत्सवाची सविस्तर माहिती दिली. अभिनेत्री अर्चना निपणकर, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, करुणा डहाळे, अधीक्षक अभियंता रवींद्र चव्हाणके, उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, डॉ. कल्पना कुटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी मयूर पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयाताई अशोक दुधारे यांच्या ‘सुमनांतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी यांनी उद्यान विभागाचे कौतुक करून जास्तीत जास्त नागरिकांनी फुलांची दुनिया पहावी असे आवाहन केले.
आयुक्तांनी आपल्या भाषणात ‘रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला! असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा! पाहुन तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा’ या शाळेतील कवितेचा उल्लेख करून नाशिकला पानाफुलांनी बहरलेले शहर म्हणून पुन्हा गुलशनाबाद सारखी जुनी ओळख मिळून देउया असे आवाहन केले. जागृत नागरिकांनी वृक्षतोडीची माहिती मनपाला द्यावी त्वरित कारवाई केली जाईल अशी ग्वाही सुद्धा दिली. अर्चना निपणकर यांनी पुष्प महोत्सवातील विविध संकल्पनांचे कौतुक करून कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मनपाचे आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते परीक्षक आणि रोझ सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय गुजराथी, पुणे रोझ सोसायटीचे माजी अध्यक्ष रवींद्र भिडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विजेत्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी आभार मानले. ‘नृत्य रंगवेध’ ने कार्यक्रमाचा समारोप झाला. सर्व मान्यवरांनी पुष्पोत्सवातील विविध फुलांचे, झाडांचे निरीक्षण करून दाद दिली. सजावटीचेही कौतुक केले.
दोन वर्षानंतर ‘पुष्पोत्सव’चे आयोजन झाल्यानं मनपा अधिकारी-कर्मचारी आणि नाशिककरांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा पेटकर यांनी केले.यंदाच्या पुष्पोत्सवामध्ये विविध गटात सुमारे ७५० प्रवेशिका आहेत. ३१ नर्सरी व ११ फूड स्टॉल आहेत. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपींग आहे. कार्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी आहे. गुलाब पुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कैक्टस, अशा शोभिवंत कुंडया ठेवल्या आहेत.
मनपा विभाग विजेत्यांची नावे
स्पर्धेसाठी एकूण २५ परिक्षक होते. मनपा विभागांतर्गत-मिनीअचर उद्यान 6 आहेत. त्यामध्ये प्रथम सर्वोत्तम उद्यान प्रतिकृती – सातपूर विभाग, द्वितीय क्रमांक – नवीन नाशिक विभाग, तृतीय क्रमांक- पंचवटी विभागाचा आला आहे. मनपा विभागांतर्गत उद्यान प्रतिकृती स्पर्धेमध्ये सहाही विभागांनी विविध संकल्पनेवर आधारीत उद्यान प्रतिकृती साकारल्या आहेत. पश्चिम विभागाने सनकन गार्डन, नाशिक पूर्व विभागाने रॉक गार्डन, नाशिक रोड विभागाने मुघल गार्डन, पंचवटी विभागाने ड्रीम पार्क तर नवीन नाशिक विभागाने हरित अमरधाम या संकल्पनेवर आधारीत उद्यान प्रतिकृती साकारली आहे.
इतर विजेत्यांची नावे
गुलाब राजा – पपयाज् नर्सरी
गुलाब राणी – आरुष सोनू काठे
गुलाब राजकुमार – पपयाज् नर्सरी
गुलाब राजकुमारी – पपयाज् नर्सरी
कुंडयाची शोभिवंत रचना सर्वोतम बोन्साय – वसुंधरा नर्सरी
फुलराणी ट्रॉफी – पपयाज् नर्सरी
ताज्या फुलांची आकर्षक पुष्परचना – माधुरी लढ्ढाज
पानी पुष्परचना/ इकेबाना – स्वप्नाली महेश जडे
पुष्परांगोळी – पंकजा संजय जोशी
सर्वोत्तम परीसर प्रतिकृती – ज्योती अरुण पाटील
सर्वोत्तम तबक उद्यान – ज्योती अरुण पाटील
सेल्फी पॉईंटला प्रतिसाद
पुष्पोत्सवातील दोन्ही सेल्फी पॉईंटला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्यालय प्रांगणातील 360 डिग्री सेल्फी आणि इमारतीच्या आतील लॉन्स वरील सेल्फी पॉईंटला अबालवृद्धांचा प्रतिसाद मिळाला. ‘पुष्पोत्सव 2023’ निमित्त छायाचित्र स्पर्धेसह विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. ‘पुष्पोत्सव 2023’ला नागरिकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेता किरण भालेराव यांची आज पुष्पप्रदर्शनला विशेष उपस्थिती
२५ मार्चला ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. या दिवशी चिन्मय उद्गीरकर, किरण भालेराव उपस्थित राहणार आहेत. २६ मार्चला विजेत्यांना ट्रॉफिजचे वितरण हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सव २६ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांसाठी खुला असणार आहे.