Nashik:देवळाली आर्टिलरीत बिबट्याचा हल्ला; ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

0

नाशिक, दि. ९ ऑगस्ट २०२५ Nashik leopard attack नाशिकच्या देवळाली आर्टिलरीजवळील वडनेर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयुष किरण भगत असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, गुरुवारी (८ ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

खेळत असताना अचानक हल्ला(Nashik leopard attack)

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यानंतर बिबट्याने त्याला ओढत-फरफटत जवळील दाट झुडपात नेले. हा प्रकार क्षणात घडल्याने कुटुंबीय आणि शेजारी हादरून गेले.

चार तासांचा शोध, अखेर दुर्दैवी शेवट

हल्ल्यानंतर आयुष दिसेनासा झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. काही वेळात वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तब्बल साडेतीन ते चार तासांच्या शोधानंतर आयुषचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वडनेर-पिंपळगाव रोड रेंजरोड भागात तसेच शेतवस्त्यांवर बिबट्यांच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण कायम आहे. नागरिकांनी वारंवार पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली असली तरी, ती अद्याप पूर्ण झालेली नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.

नुकताच निफाडमध्येही बिबट्यांचा वावर

काही दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन झाल्यानेही खळबळ माजली होती. शेतकऱ्यांनी त्यावेळी बिबट्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात टिपल्या होत्या. शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली होती.

वन विभागावर दुर्लक्षाचा आरोप

या घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागावर दुर्लक्षाचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. “वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असतानाही आणि जिवाला धोका असतानाही योग्य ती कारवाई केली नाही. यामुळेच आज एका चिमुकल्याचा जीव गेला,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

परिसरातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, तसेच गावात आणि शेतवस्त्यांवर सतत गस्त ठेवावी, अशी मागणी केली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!