जुन्या नाशकात आमदार फरांदे व वसंत गीते यांच्यामध्ये वाद
मतदारांमध्ये उत्साह असल्यामुळे भाजपकडून बिनबुडाचे आरोप -विनायक पांडे
नाशिक,दि, २० मे २०२४ –जुने नाशिक परिसरातील चौक मंडईमधील परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते आणि भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे यांच्यात बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. बूथ क्रमांक ४० मध्ये बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून भाजपा आणि ठाकरे गट शिवसेनेमधील नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि नंतर हा वाद शांत झाला.
आज नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई येथील बूथ क्रमांक ४० मध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तातडीने भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे व इतर कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले.त्यांनी मतदारांना ओळखपत्र विचारून आतमध्ये सोडण्यास सुरुवात केली.
या विषयावरून या ठिकाणी ठाकरे गटाचे उपस्थित नेते माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.अतिशय सुरळीत सुरू असलेल्या या मतदानाला अडवू नका, अशी मागणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आमदार फरांदे यांच्याकडे करत होते. यामुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील वाद हा वाढत गेला.
ठाकरे गटाकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला. तर मतदारांमध्ये उत्साह असल्यामुळे भाजपकडून बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. नाशिकची निवडणुक निष्ठावान विरुद्ध गद्दार असल्याने भाजपकडून दांडशाहीचा वापर करत असल्याचा आरोपही विनायक पांडे यांनी केला आहे.अखेर या ठिकाणी पोलिसांनी काही हस्तक्षेप करून हा वाद मिटविला.पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली.
राजाभाऊ वाजे,हेमंत गोडसे,शांतीगिरी महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क
नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या परिवारासह मतदान केले आहे.नाशिकमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.