नाशिक,दि. २० मे २०२४ –नाशिक लोकसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली असून वाढत्या उन्हा मुळे लोकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दाखवली आहे. यातच नाशिक मधून मोठी बातमी समोर येत आहे .नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मतदान केंद्रातील वोटिंग कम्पार्टमेंटला पुष्पहार घालून नमस्कार केला म्हणून हा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असल्याचे समजते आहे.
याबाबत माहिती अशी, की नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. त्यावेळी त्र्यंबकेश्वर येथे १०५ क्रमांकाच्या मतदान केंद्रात अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे आले होते. त्यावेळी त्यांनी मतदान केंद्रातील वोर्टिंग कम्पार्टमेंटला पुष्पहार घालून नमस्कार केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर नायब तहसिलदार महाले यांनी पोलीस ठाण्यात शांतीगिरी महाराजांनी आचारसंहिताभंग केल्याप्रकरणी तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान यावेळी शांतीगिरी महाराज यांच्या समर्थकांनी भगवे वस्त्र परिधान करुन केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे या समर्थकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात काम सुरू आहे.