सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका;घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ !
तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ,पुढील काळात आणखी दरवाढीची शक्यता?

नवी दिल्ली, ७ जून २०२६ : LPG Gas Price Hike देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना आज पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
महागाईच्या वाढत्या दबावामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
मुंबईसह प्रमुख शहरांतील नवीन दर
नवीन दरानुसार मुंबईमध्ये 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर कोलकातामध्ये सिलेंडरचा दर 968 रुपये आणि चेन्नईमध्ये 957.50 रुपये झाला आहे.
शहर जुना दर नवीन दर
दिल्ली ₹913 ₹942
मुंबई ₹912.50 ₹941.50
कोलकाता ₹939 ₹968
चेन्नई ₹928.50 ₹957.50
जागतिक परिस्थितीचा परिणाम
आखाती देशांमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे इंधनाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर होत आहे.
व्यावसायिक गॅसलाही महागाईची झळ
याआधी 1 जून रोजी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यांत व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली असून जानेवारी महिन्यात 1580 रुपये असलेला सिलेंडर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे.
पुढील काळात आणखी दरवाढीची शक्यता?
सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरवर अजूनही मोठ्या प्रमाणात अनुदानाचा भार आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल,अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडत असून महागाईचा ताण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


