नाशिक महापालिका निवडणूक २०२६ : भाजपच्या राड्यानंतर शिंदेसेनेतही अंतर्गत वाद उफाळले
इच्छुक उमेदवाराचा आत्महत्येचा इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ


नाशिक, दि. ३ जानेवारी २०२६–Nashik Mahanagarpalika Electionनाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी भाजपमध्ये उमेदवारी आणि एबी फॉर्म वाटपावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही (शिंदे गट) गंभीर अंतर्गत वाद उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पत्र पोस्ट करत थेट आत्महत्येचा इशारा दिल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या पत्रात त्यांनी पत्नीसह आयुष्याचा शेवट करण्याचा उल्लेख केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
शिवा तेलंग यांनी लिहिलेल्या या पत्रात पक्षातील काही प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवा तेलंग हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पत्रानुसार, सन २०२२ मध्ये शिवा तेलंग आणि त्यांची पत्नी पूजा तेलंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ३१ मध्ये समाजसेवा, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि पक्षसंघटन यासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. मात्र, माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांनी आपला केवळ राजकीय वापर केल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
शिवा तेलंग यांनी असेही नमूद केले आहे की, पक्षप्रवेशाच्या वेळी प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या निधीची कमिटमेंट देण्यात आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रभागासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र केवळ भूमिपूजन झाले, विकासकामे कुठेच दिसत नाहीत. “निधी आला असेल, तर तो नेमका कुठे गेला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे. अमोल जाधव यांच्या माध्यमातून निधी आणल्याचा दावा करण्यात आला, पण प्रत्यक्ष कामे न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महापालिका(Nashik Mahanagarpalika Election) निवडणुकीतील एबी फॉर्म वाटपावरून वाद अधिकच चिघळला आहे. २९ डिसेंबरच्या रात्री कॅनडा कॉर्नर परिसरात एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवा तेलंग यांनी पत्रात केला आहे. एबी फॉर्म मिळवण्यासाठी पैसे मागितले गेले आणि पैसे देऊन फॉर्म घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कथित प्रक्रियेत हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, प्रवीण ‘बंटी’ तिदमे यांच्यासह काही नेते सहभागी असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
याच प्रभागात एकाच वेळी दोन इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आल्याने संभ्रम आणि असंतोष निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्याचे आदेश असतानाही ते स्थानिक पातळीवर अमलात न आणले गेल्याचा आरोप त्यांनी माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्यावर केला आहे. “मी स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. तरीही स्थानिक नेत्यांनी निर्णय बदलला,” असा दावा करत त्यांनी आपला विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
या पत्राचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे शेवटी दिलेला आत्महत्येचा इशारा. “मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे,” असे स्पष्ट शब्दांत नमूद करत शिवा तेलंग यांनी आपल्या संभाव्य मृत्यूसाठी काही नेत्यांची नावे जबाबदार म्हणून नमूद केली आहेत. आपल्या पत्नी व मुलांना न्याय मिळावा, अशी भावनिक विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.
दरम्यान, हे पत्र व्हायरल झाल्यानंतर शिवा तेलंग यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील राजकीय वातावरण आधीच तापले असताना, या घटनेमुळे शिंदेसेनेतील अंतर्गत कलह, तिकीट वाटपाची पद्धत आणि कथित आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्ष नेतृत्व या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का, आणि शिवा तेलंग यांच्या आरोपांवर संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


