नाशिक महापालिकेच्या रणांगणात कलावंतांचा प्रवेश
जनस्थानच्या दोन सदस्यांमुळे सभागृहात पोहोचणार सर्जनशील आवाज


नाशिक, दि. ६ जानेवारी २०२६ : Nashik Municipal Election 2026 महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींसाठी परिचित असलेल्या जनस्थान या कलावंतांच्या समूहातील दोन सक्रीय सदस्य नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरल्याने शहरातील कलावंत वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, या निवडणुकीत कलावंतांचा थेट प्रतिनिधी महापालिका सभागृहात पोहोचणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक १२ (क) मधून जनस्थानच्या सदस्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच गोदावरी स्वच्छता अभियानात अग्रणी भूमिका बजावलेल्या कु. नुपूर लक्ष्मण सावजी या निवडणूक लढवत आहेत. तर प्रभाग क्रमांक ७ (क) मधून सुप्रसिद्ध लेखिका, के. टी. एच. एम. महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापिका वंदना उदय रकिबे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राला थेट महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जनस्थान या मंचाच्या माध्यमातून नाशिकमध्ये विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. गोदावरी स्वच्छता अभियान, पाणीप्रश्नावर आधारित जनजागृती, नाशिकच्या नाट्यगृहांसाठीची चळवळ, तसेच नाशिकमध्ये उभारल्या जाणाऱ्या चित्रपट नगरीसाठीचे प्रयत्न — अशा अनेक विषयांवर कलावंत एकत्र येऊन कार्यरत असतात. या सर्व उपक्रमांमध्ये नुपूर सावजी आणि वंदना रकिबे या दोघीही सातत्याने अग्रभागी राहिल्या आहेत.
अभिनय, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम(Nashik Municipal Election 2026)
नुपूर सावजी या एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक मराठी मालिका, नाटके आणि जाहिरातींमधून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. योग योगेश्वर जय शंकर, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.तसेच रंगभूमीवर हंडाभर चांदणे ,गढीवरच्या पोरी या नाटकातील नूपुरच्या भूमिका विशेष गाजल्या रंगभूमीपासून छोट्या पडद्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कलात्मकतेसह सामाजिक भान जपणारा ठरला आहे.
अभिनयाबरोबरच नुपूर सावजी यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. संस्कार भारती, संस्कृत भाषा सभा यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्या समाजसेवेचे कार्य करत आहेत. हा अनुभव आणि सामाजिक जाणिवा महापालिकेच्या सभागृहात कलावंतांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास नाशिकमधील कलावंत व्यक्त करत आहेत.
कलावंतांचा आवाज सभागृहात
वंदना रकिबे या लेखिका आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असून, सामाजिक प्रश्नांवरील त्यांची स्पष्ट मते आणि लेखन नाशिकमध्ये परिचित आहे. शिक्षण, संस्कृती आणि समाजहिताच्या मुद्द्यांवर त्यांचा ठाम दृष्टिकोन महापालिकेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या दोन उमेदवारांमुळे नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आणि सर्जनशील विचारांचा आवाज पोहोचणार आहे. त्यामुळे नाशिकच्या कलावंत वर्गात “आता आपला प्रतिनिधी आपले प्रश्न मांडणार” अशी भावना निर्माण झाली असून, निवडणुकीकडे कलावंत विशेष लक्ष ठेवून आहेत.

