
नाशिक, दि. १९ डिसेंबर २०२५ – Nashik Water Supply Shutdown स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लोमिटर बसविणे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची महत्त्वाची कामे प्रस्तावित असल्याने शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन दरम्यान शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा सुधारणा, पाइपलाइन दुरुस्ती, व्हॉल्व्ह बसविणे व लिकेज काढण्याची कामे केली जाणार आहेत.
नाशिक पूर्व विभाग (Nashik Water Supply Shutdown)
नाशिक पूर्व भागात द्वारका व गोडेबाबा जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या ५०० मि.मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीवर एम.एस. बँड बसविणे, सुचित्ता नगर जलकुंभ येथे एअर व्हॉल दुरुस्ती तसेच गांधीनगर जलकुंभ परिसरात ७०० मि.मी. व्यासाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती, एअर व्हॉल दुरुस्ती आणि पाइपलाइन लिकेज काढण्याची कामे होणार आहेत.
नाशिक रोड विभाग
प्रभाग क्रमांक २१ मध्ये मुक्तीधाम जलकुंभाजवळ कुलकर्णी पंपाजवळील ३०० मि.मी. व्यासाच्या एम.एस. पाइपलाइनवरील मोठ्या गळतीची दुरुस्ती, ६०० मि.मी. पाइपलाइनवरील फ्लोमिटर लिकेज दुरुस्ती, तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत इनलेट–आऊटलेट लाईनवर नवीन व्हॉल्व्ह व फ्लोमिटर बसविण्याची कामे केली जाणार आहेत.
पंचवटी विभाग
पेठरोड, मखमलाबाद परिसरात उर्ध्ववाहिन्यांचे क्रॉस कनेक्शन, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रातील नवीन जलकुंभांच्या मुख्य वितरण वाहिनीवर क्रॉस कनेक्शन तसेच कैलासनगर, संभाजीनगर रोड व गंगापूर डावा तट कालवा परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मुख्य वितरण वाहिनीचे काम केले जाणार आहे.
सातपूर विभाग
सातपूर परिसरात विविध ठिकाणी ४०० ते १२०० मि.मी. व्यासाच्या पाइपलाइन लिकेज काढणे, नवीन पाइपलाइन टाकणे, व्हॉशआऊट व व्हॉल्व्ह लिकेज दुरुस्ती, तसेच अमृतमणी, दत्तनगर, नाईक पाण्याची टाकी आदी ठिकाणी इनलेट व आऊटलेट व्हॉल्व्ह बसविण्याची कामे प्रस्तावित आहेत.
नवीन नाशिक विभाग
नवीन नाशिकमध्ये ९०० मि.मी. व्यासाच्या पाइपलाइनवरील लिकेज दुरुस्ती तसेच अंबड ईएसआर येथे ७०० मि.मी. व्हॉल्व्ह रिपेअरिंगचे काम करण्यात येणार आहे.महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ही सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण दिवस नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पाणीपुरवठा सुरू होईल, मात्र तो कमी दाबाने राहण्याची शक्यता आहे.नागरिकांनी पाण्याचा साठा करून घ्यावा तसेच नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता (प्रकल्प), साआअवि (पापु), नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.



