नाशिक,दि.२७ मे २०२३ –संगीताचा प्रचार आणि प्रसाराकरीता कार्य करणाऱ्या नाशिक मधील पवार तबला अकादमी ,आदिताल तबला अकादमी, नृत्यानंद कथक नृत्य संस्था आणि सृजननाद इंडियन क्लासिकल आर्ट्स यांचे शिष्य मलेशिया येथे होणाऱ्या”अनुभूती”या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दिनांक २८ मे ते ४ जून पर्यंत चालणाऱ्या या संगीत दौऱ्यामध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमात हे सर्व कलाकार आपली कला सादर करणार आहेत.मलेशियातील सेलांगोर येथील रामकृष्ण मिशन तसेच क्वालालंपूर येथील लक्ष्मी नारायण मंदिर तसेच टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स येथे कार्यक्रम होणार आहेत.
वरील कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध गायक डॉ.अविराज तायडे व पं.मकरंद हिंगणे गायन सादर करणार आहेत.तसेच प्रसिध्द तबला वादक व गुरू नितीन पवार व त्यांचे शिष्य विराज मोडक ,अथर्व शाळीग्राम ; प्रसिद्ध तबला वादक गुरू नितीन वारे व त्यांचे शिष्य अंकुश रहाळकर हे सर्व तबला सहवादन सादर करणार आहेत.कथक नृत्यांगना कीर्ती शुक्ल या तसेच यांच्या विद्यार्थिनी गार्गी पाटील,रुद्रा वालझाडे ,मैत्रेयी गायधनी ,देवश्री पाटील ,अर्चना टोळ कथक नृत्य सादर करतील. तसेच भरतनाट्यम् नृत्यांगना शिल्पा देशमुख या व त्यांच्या शिष्या मुक्ता कुलकर्णी ,इरा कुलकर्णी ,रितिका जगताप ,ऋचा देवरे आणि गायत्री हंडी या भरतनाट्यम् नृत्य सादर करणार आहेत.
वरील सर्व कार्यक्रमात मलेशियातील सुरसंगीत अकादमी सहयोगी आहे.सर्व विद्यार्थ्यांना नितीन पवार,नितीन वारे,कीर्ती शुक्ल आणि शिल्पा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.