पार्वतीच्या बाळा…

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

शिवाजी घडवायचा असेल तर आधी जिजाबाई जन्माला यावी लागते. गणपतीला आकार द्यायचा असेल तर आधी पार्वतीला कष्ट करावे लागतात. तेव्हाच एका मातेच्या डोळ्यातलं स्वप्न प्रत्यक्षात उतरतं आणि त्या मातेची कीर्ती क्षितीजाच्या पलीकडे नेऊन ठेवतं.

 

बाप्पा,येतोस दरवर्षी तेव्हा रडते का रे आई ?

कुठे दहा , कुठे पाच,कुठे दिड दिवसाची घाई !

बाप्पा आला म्हणून आम्ही करतो आरती,

पार्वतीला भरुन पावतं, बघुन तुझी किर्ती !

श्यामल कृष्ण, राम सावळा,

सगळ्यांपेक्षा देवा  तुच कसा वेगळा !

जगावेगळं रुप म्हणुन  तिने तुला झाकलं नाही,

बाप्पा तुझ्या गुणांनी  तु जगाला जिंकलंस,

रुप, रंग दुय्यम असतं हेच जगाला दाखवलंस !

 

पार्वतीच्या बाळा म्हणतानाच पार्वतीवर त्या बालकाला आकार देण्याची किती मोठी जबाबदारी होती हे आपल्या लक्षात आलंच असेल. माता म्हणून आपल्यावरही तेवढीच जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. खरंतर आई म्हणजे ‘आत्मा आणि ईश्वर यांचा संगम’ हे जरी आपण वर्षानुवर्ष ऐकले असेल तरी आत्ताची, या काळातली आई ही “आगतिकता आणि इमर्जन्सी” या दोन शब्दांत  मांडता येते.

 

घराबाहेर पडून नोकरी करण्याची आगतिकता, याच बरोबर मुलांसाठी सतत ‘इमर्जन्सी मोडवर’ राहणं हेच आत्ताच्या आईचं जगणं आहे. कधीकधी नोकरीच्या ठिकाणी घरचे विचार स्वस्थ बसू देत नाहीत, तर कधी घरी असूनही नोकरीच्या विवंचना जगू देत नाहीत. यातच मुलांना घडवण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची असते. शिवाजी घडवायचा असेल तर आधी जिजाबाई जन्माला यावी लागते. गणपतीला आकार द्यायचा असेल तर आधी पार्वतीला कष्ट करावे लागतात. तेव्हाच एका मातेच्या डोळ्यातलं स्वप्न प्रत्यक्षात उतरतं आणि त्या मातेची कीर्ती क्षितीजाच्या पलीकडे नेऊन ठेवतं. मातेला कायम आपल्या मुलांसाठी भक्कम रहावं लागतं, प्रसंगी वाईटपणाही घ्यावा लागतो.

 

 

महादेवाने आपल्या मुलाचा शिरच्छेद केलेला बघून पार्वती महादेवाविरुद्ध उभी ठाकली होती. तिच्या पुत्राची बाजू तिने सांभाळली होती. एवढेच नव्हे तर मृत पुत्राला जिवंत करण्याचा हट्टही तिने धरला होता. यातूनच गणेशाला जीवदान मिळालं. मात्र हत्तीचे मुख त्याला देण्यात आलं. तरीही त्याच्या बदललेल्या रूपाचा विधिनिषेध न ठेवता पार्वतीने पुत्रावर आयुष्यभर निस्सीम प्रेम केलं. त्याला सर्वार्थाने स्वीकारलं. मला वाटतं ‘स्वीकार करणे’ ही नात्याची पहिली पायरी असते. आपणही आपलं मूल जसं आहे तसं स्वीकारायला हवं. बालक आणि पालक नात्यांमध्ये आईची भूमिका खूप महत्त्वाची असते जसं गणेशाला जीवनदान पार्वती मुळे मिळालं तसं महत्व प्रत्येक आईचं आहे. 

 

एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्न विचारला, “स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढं महत्त्व पित्याला का दिलं जात नाही ? मातेइतकाच पितासुद्धा महत्त्वाचा असतो ना ?” स्वामी विवेकानंद यावर काहीच बोलले नाहीत. त्यांनी एक मोठा दगड उचलला आणि प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला दिला. त्याला म्हणाले, “बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनेमाची सगळी कामं कर. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुलाच सापडेल.” दुसऱ्या दिवशी सकाळी ओरडत तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला. “स्वामीजी, माझी कंबर पोट दोन्ही खूप दुखत आहे. मी असा काय प्रश्न विचारला ज्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली ? माझी कंबर आणि पोट दुखून मी अगदी हैराण झालो आहे.” यावर स्वामी मंदस्मित करत म्हणाले, “बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाल नाही का ? अरे, जिने नऊ महिने पोटात तुला वाढवलं, तुझं कधीही तिला ओझं झालं नाही, तिने तुझा कंटाळा केला नाही, त्या मातेची महती पित्यापेक्षा जास्त असणारच, नाही का ?”

 

बाळाच्या जन्माबरोबरच आपणही आई होतो आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात होते. या गमतीशीर प्रवासात आपल्याला “आई” ही पदवी बहाल करणाऱ्या लेकराची तुलना इतर कोणाशी करून आपण मात्र आपल्या प्रवासाची गंमत घालवतो. आपलं मूल शेजारपाजारच्या मुलांपेक्षा डाव असलं तरीही प्रत्येक मुलात काहीतरी गुण असतात हे लक्षात ठेवून आपल्या मुलांमधले गुण शोधून त्याचा विकास करण्याचा ध्यास आईने घ्यायला हवा. “आई माझा गुरु, आई कल्पतरु, सुखाचा सागरू, आई माझी!” ही प्रार्थना आपण सगळ्यांनीच लहानपणी म्हंटली असेल किंवा ऐकली तरी असेल. ‘शाळेआधीचा गुरु म्हणजे आई आणि शाळेनंतरचा गुरु म्हणजे ही ‘आईच’ !

 

आज आपण पार्वती आणि गणेश यांना डोळ्यासमोर बघतो आहे, म्हणून त्यांच्या नात्याविषयी बोलता-बोलता आपल्या हाती नवीन लागतं का ते बघुया.

 

सर्वप्रथम गणेशाचे गुण बघूया ! गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. त्याच बरोबर बुद्धीची, विविध कलांची दाता आहे. गणपतीला कधीही चिडलेलं आपण बघितलं नाही किंवा तशी एखादी कथाही आपण ऐकलेली नाही. गजमुख असणाऱ्या गणपतीच रुप वेगळं असलं तरी मोहक आहे. गणपतीचे स्वरूप आणि गणपतीचे तत्व हे इतर देवदेवतांपेक्षा वेगळं आहे.

 

गणपतीचा गजमुख होण्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे मात्र त्याला पुनर्जीवित करताना हत्तीचं तोंड का लावलं गेलं ? तर हत्ती अतिशय बुद्धिमान प्राणी असतो. हत्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो डगमगत नाही म्हणून गणपतीला हत्तीचे मुख लावलं असावं. जसा गणपती कुठल्याही परिस्थितीत डगमगत नाही, कुठल्याही परिस्थितीला आत्मविश्‍वासाने सामोरे जातो, तसंच आपली मुलं कुठल्याही परिस्थितीत न डगमगता, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून त्या परिस्थितीवर मात करतील इतकं सक्षम आपण त्यांना बनवायला हवं. 

 

गणपतीला शुर्पकर्ण म्हणतात कारण गणपतीचे कान सुपासारखे मोठे आहेत. मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक मानले जातात. कान हे मुख्य ज्ञानेंद्रिय आहे. कुठलीही चांगली गोष्ट सर्वप्रथम आपण ऐकतो आणि मग त्याप्रमाणे आपण कृती करतो. गुरुमंत्र देखील कानातच दिला जातो. आपण सुपासारखे कान याचा थोडासा वेगळा अर्थ घेतला तर ज्याप्रमाणे धान्य पाखडताना आपण सुप वापरतो, त्यामधून कचरा उडवून लावतो आणि चांगलं धान्य स्वतःकडे ठेवतो तसंच सुपासारख्या कानांचा वापर करून वाईट गोष्टी उडवून लावू आणि चांगल्या तेवढ्याच मनामध्ये जतन करून ठेवू याची सवय पालक म्हणून आपण मुलांना लावू शकतो.

 

गणपतीच्या छोट्या- छोट्या डोळ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघण्याची कला आपल्याला दिली आहे. यातून आपण मुलांना निरीक्षणाची सवय लावू शकतो. कित्येकदा एखाद्या छोट्या गोष्टीचे निरीक्षण करून खूप मोठं मार्गदर्शन मुलांना मिळू शकतं.

 

लंबोदर असणाऱ्या गणपतीकडुन काय शिकायचं ? तर आपल्या आजूबाजूला असणारे सर्व चांगले वाईट प्रवाह, विचार, आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेता आले पाहिजेत. जय पराजय, निंदा, स्तुती या गोष्टी आपल्याला पोटातल्या पोटात पचवून, त्यातील चांगलं ते आपल्या वागण्यात उतरवता आलं पाहिजे हा विचार मुलांना द्यायला हवा.

गणपती विद्येची देवता असूनही आपल्याला गणपतीच्या चार भुजांपैकी एका हातात कुऱ्हाड दिसते. ही कुऱ्हाड मुक्ततेचं प्रतीक आहे. ज्ञानार्जन करून मोहाची बंधन कापता येतात आणि वाईट गोष्टी मुळापासून या कुर्‍हाडीने कापून टाकता येतात. आपल्या मुलांनीही चांगले शिक्षण घेऊन आपल्यातल्या वाईट गुणांना काढून टाकले पाहिजे आणि योग्य विचारांच्या मार्गावर मुक्तपणे त्यांना जाता आले पाहिजे.

 

आपल्या हातात थोडा पैसा खेळायला लागला कि आपल्याला मोठं घर, मोठी गाडी, याची स्वप्न पडायला लागतात मात्र गणपती बाप्पा हे देव असूनही, कुबेर त्यांच्या घरी पाणी भरत असूनही यांचे वाहन मात्र एक छोटासा उंदीर आहे. यामागे सुद्धा एक विशेष कारण आहे. उंदीर प्रत्येक गोष्ट कुरतडून पाहतो तेव्हा ती गोष्ट कामाची आहे की नाही हे तपासले जाते. गोष्ट कामाची असेल तर त्याचा वापर केला जातो आणि कामाची नसेल तर ती गोष्ट तिथेच सोडून पुढे निघून जातो. तसं आपल्या मुलांनी कसं वागायचं, कशाला महत्त्व द्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे आपल्या मुलांना शिकवायला हवं नाहीतर नको त्या गोष्टींचा भार मनावर घेऊन ज्या गोष्टी खरोखर करायला हव्यात नेमकं तिकडेच मुलांचं दुर्लक्ष होतं आणि त्यांची प्रगती होत नाही .

 

गणपतीचे हे गुण धारण करून आपल्या मुलांची नक्कीच प्रगती होऊ शकते. मुलांच्या प्रगतीसाठी आईचा वाटा खूप महत्त्वाचा ठरतो म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपल्यातली पार्वती जागृत ठेवायला हवी तरच आपली मुलं ही गणेशासारखी ‘गुणेश’ होतील. 

 

कुठलंही मुल ओल्या मातीचा गोळा असतं. कधी थापटत, कधी त्याचा नको असलेला भाग बाजूला काढत सतत चक्रावर गोलाकार फिरवत या ओल्या मातीला आकार देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असते एकदा त्याला आकार दिला आणि परिस्थितीच्या भट्टी मधून तावून सुलाखून हे बाहेर पडले की मग आपल्याला उसंत घेण्याची परवानगी असते तोवर आपले हातही थांबायला नको आणि अव्याहत चाललेलं प्रयत्नांचं चक्र ही थांबायला नको.

 

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

 

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

 

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

 

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.

eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.