नाशिक,दि.१३ मे २०२३ – पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी ‘तालाभिषेक बैठक’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन आज शनिवार,दि. १३ मे २०२३ रोजी सायं ६ वा विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केली आहे. या मैफिलीत नाशिकचे युवा गायक आणि प्रा. अविराज तायडे व पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य आरोह ओक यांचे शास्त्रीय गायन होईल. आरोह ओक यांस भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची गायन विषयासाठी शिष्यवृत्ती मिळत असून अनेक मैफिलींतून त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यांना दिव्या रानडे (संवादिनी) आणि सारंग तत्ववादी (तबला) साथ करतील.
यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध युवा तबलावादक स्वप्नील भिसे यांचे एकल तबला वादन होईल .स्वप्नील भिसे हे पं .चंद्रकांत भोसेकर,प्रवीण करकरे आणि पं. योगेश सम्सी यांचे शिष्य असून भारतभर स्वतंत्र तबलावादनाबरोबरच गायन ,वाद्यसंगीत आणि कथक नृत्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांना त्यांनी साथसंगत केली आहे. आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात त्यांना राष्ट्रीय पातळीवर तबलावादन सुवर्णपदक मिळाले आहे. यासोबतच तबलावादनासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती देखील त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांना प्रशांत महाबळ (संवादिनी ) साथ करतील.
जानेवारी महिन्यात प्रथमच ‘तालाभिषेक बैठक ’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन केले गेले. दर दोन महिन्यांतून एकदा असे या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध तबला वादक व संगीत तज्ञ डॉ संजीव शेलार, तसेच निरंजन सोनवणे , सपना खैरनार, संजीवनी देसाई हे लाभणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.हा कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे .तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शीयल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी केले आहे.