नाशिक,दि.८ जानेवारी २०२३ – नायलॉन मांजाची खरेदी किंवा विक्री करण्यास मनाई असताना देखील छुप्या पद्धतीने त्याची विक्री करणे नाशिकमधील चौघांना चांगलेच महागात पडले आहे. हे चौघे नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी चौघांना थेट तडीपार केले आहे.पोलीस आयुक्त अंकुश शिंद, नाशिक शहर यांनी नायलॉन मांजा खरेदी-विक्री मांजा साठा, वापर करण्याचा मनाई आदेश जारी करत गुन्हा दाखल होताच संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले
अजिंक्य प्रदीप भिसे (वय ३४, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको), बाळासाहेब खंडेराव राहिंज (वय ४१, रा. जेलरोड, नाशिकरोड), समाधान राजेंद्र मोरसकर (वय १९, रा. गणेश चौक, सिडको), हेमंत विरेंद्र गोला (वय १९, रा. सिडको) अशी तडीपार केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांची नावे आहेत. या चौघांवर मांजा विक्री प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्याकडे दिला होता. त्यानुसार खांडवी यांनी चौघांना २० दिवसांसाठी नाशिक शहरातून तडीपार केले आहे.