नाशिक – ‘वैभवशाली प्राचीन लिपी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन नासिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. सुरज मांढरे, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे,उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले हा दिवाळी अंक नावाप्रमाणेच प्राचीन लिपींमधून प्रकाशित झाला आहे. वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टचे मुख्य ध्येय सर्वसामान्य लोकांना ब्राम्ही, खरोष्टी, शारदा, ग्रंथ, मोडी, नेवरी, फारसी या लिप्या वाचता लिहिता याव्या तसेच भारतातील सर्व शिलालेख, दस्तावेज, ताम्रपत्र यावरील मजकूर समजावा यासाठी करण्यात आला आहे. या दिवाळी अंकामध्ये या सर्व प्राचीन लिपीचे लेख याच लिपीमध्ये लिहिले आहेत आणि त्याचे लिप्यांतर देवनागरी लिपीत केलेले आहे.
पुस्तकाची प्रस्तावना मुंबईमधील प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. कुरुष एफ दलाल यांनी केले आहे. पुस्तकातील पहिला लेख लिपींचे शिक्षण आणि वाचन, हेचि लिप्यांतर साधन,हा लेख सर्वांना वाचता यावा यासाठी देवनागरी लिपीत प्रकाशित करण्यात येत आहे. त्यात काय अडचणी येऊ शकतात, लिपी शिकण्याचे महत्व यावर अडव्होकेट विलास भगवान कडू यांनी लेखन केले आहे, दुसरा लेख धनत्रयोदशी या विषयावर धनत्रयोदशी म्हणजे काय, ती का साजरा करतात, त्यामागचा इतिहास ब्राम्ही लिपीमध्ये मुंबईची गायत्री रेडे हिने लिहिला आहे, तिसरा लेख नरक चतुर्दशी विषयावर या दिवसाचे महत्व, इतिहास खरोष्टी लिपीमध्ये संस्थेचे अध्यक्ष सोज्वळ साळी यांनी लिहिला आहे आणि चौथा लेख शारदा लिपीमध्ये लक्ष्मीपूजन हा लेक साळी यांनी लिहिला आहे.
पाचवा लेख जुनी तामिळ लिपी म्हणजेच ग्रंथ लिपीमध्ये रायगड येथील अपूर्वा काळे हिने भाऊबीज या दिवसाचे महत्व, इतिहास हा लेख या प्राचीन लिपीमध्ये लिहिला आहे, सहावा लेख यादवकालीन व शिवकाळात प्रचलित असलेल्या मोडी लिपीमध्ये गोवर्धन पूजा, त्याचा इतिहास, कृष्णाची कथा राजगुरूनगर, पुणे येथील श्री निलेश खांगटे यांनी लिहिले आहे, नेवरी या लिपीमध्ये पाडवा या विषयावर अपूर्वा काळे हिचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. आणि शेवटचा लेख फारसी या प्राचीन लिपीमध्ये भारताची अनोखी दिवाळी या विषयाने संपूर्ण दिवाळीचे वर्णन फारसी लिपीत केले आहे.
या प्रकाशनाचा महत्वाचा उद्देश या सर्व लिप्या लोकांना प्रत्यक्षरीत्या घराघरात दिसाव्या, त्या लिप्या लिहिण्याची, वाचनाची आवड निर्माण व्हावी व खास करून नवीन पिढीने इतिहास व लिपी यात जास्त रस दाखवून भारताचा अप्रकाशित इतिहास जगासमोर मांडावा हा आहे, या अंकाचे संपादक सोज्वळ साळी, संकल्पना शैलेंद्र साळी, मार्गदर्शक अडव्होकेट विलास कडू, सहाय्यक सौ लता साळी, श्री भूषण दिंडे, श्री सुभाष गांधी, श्री अनिरुद्ध चौरे हे या अंकाचे प्रमुख कार्य करणारे आहेत. हा अंक 1 नोव्हेंबर 2021 पासून उपलब्ध असेल, हे पुस्तक प्राप्त करण्यासाठी सोज्वळ साळी ८२०८५६५१७६ यावर संपर्क साधावा.