पावसामुळे संमेलन कार्यक्रमास व्यत्यय येणार नाही : कार्यक्रमस्थळांचे फेरनियोजन
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांचे नाशकात आगमन
साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; मंत्री छगन भुजबळ यांनी केली संमेलन स्थळाची पाहणी
नाशिक –कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आहे. या साहित्य संमेलन कार्यक्रमास पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात असून संमेलन स्थळी सुरू असलेल्या कामांची स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संमेलनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.
यावेळी संमेलन समन्वयक समीर भुजबळ,कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर,प्राचार्य प्रशांत पाटील,जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे,दिलीप खैरे,स्वप्नील पाटील,समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आज सकाळपासून पाऊस जरी सुरू झाला असला तरी आवश्यक ती खबरदारी आपण घेतलेली आहे.पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नाही. मुख्यमंडप हा पावसापासून पूर्ण संरक्षण होईल या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कुठलीही अडचण होणार नाही. केवळ जे कार्यक्रम आपण खुल्या व्यासपीठावर घेणार होतो ते कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. याठिकाणी पहिल्या पेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तसेच जास्तीत जास्त नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास मंडपाच्या दोन्ही बाजूने चर खोदून पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलन स्थळी सुरू असलेल्या सर्व कामकाजाची पाहणी करून कार्यक्रम स्थळी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. तसेच हे साहित्य संमेलन सर्व नाशिककरांचे असून सर्वांना मोफत प्रवेश आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कार्यक्रमस्थळी करण्यात आलेले फेरनियोजन….
बालसाहित्य मेळावा – मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत
कवी कट्टा – कॉलेज कँटीन जागेत
गझल कट्टा – सेमिनार हॉल
उद्या माझ्या जीवीची आवडी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
संमेलनपूर्व कार्यक्रम “माझे जीवीची आवडी “हा कार्यक्रम दिनांक २ डिसेंबर २०२१रोजी सायंकाळी पाच वाजता कुसुमाग्रज नगरीत (भुजबळ नाॅलेज सिटी, आडगाव, नाशिक)होणार आहे. हा कार्यक्रम लोकप्रिय गायक व संगीतकार सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे हे सादर करणार आहेत. गायक ॠषिकेश रानडे, विभावरी आपटे-जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी, काव्यवाचन चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे आदी असणार आहेत. सूत्र संचालन मिलींद कुलकर्णी हे करणार आहेत. साथीला वादक आदित्य आठल्ये, रितेश ओव्हळ,राजेंद्र दुरकर,अमर ओक हे असतील.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांचे नाशकात आगमन
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, सरचिटणीस डॉ. दादा गोरे तसेच अडकरे यांचे नाशिकला आगमन झाले. त्यांचे स्वागत संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टाकले यांनी केले. या प्रसंगीं संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकला संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिनांक ३ रोजी दुपारी चार वाजता जेष्ठ विज्ञान लेखक जयंतराव नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली व ख्यातकीर्द कादंबरीकार विश्वासराव पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे. दीपप्रज्वलन आणि विविध सारस्वतांच्या महत्वाच्या ग्रंथांचे पूजन करून संमेलनाचा होणारा हा शुभारंभ “ह्याची देही ह्याची डोळी ”
प्रसन्न वातावरणात अनुभवण्यासाठी या सोहळ्याला सर्व साहित्यप्रेमींनाआग्रहाचे निमंत्रण.
एक आवर्जून खुलासा हा की या संमेलनासाठी कोणत्याही प्रवेशपत्रिका नसून कोरोनाचे नियम पाळणाऱ्या सर्वांसाठी तिन्ही दिवसाचे मनोरंजनासक्ह सर्व कार्यक्रम खुले आहेत.
९४व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचा मुख्य मंडप तसेच सर्व कार्यक्रमांचे उपमंडप आता बंदिस्त व वॉटरप्रूफ प्रकारचे आहेत. संमेलनात सर्वांना प्रवेश खुला असून मास्कचा वापर सोडला तर इतर कुठला ही निर्बंध असणार आहे.
हा कार्यक्रम मुख्य मंडपात होणार असून ते बंदिस्त व वाॅटरप्रुफ आहे. कार्यक्रमाला येण्या-जाण्यासाठी बसेसची सोय आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असून त्याला कोणताही पास,तिकिट नाही. सर्वांनी बहुसंख्येने यावे.
उद्यापासून कालिदास कलामंदिरचे कार्यालय संमेलनस्थळी हलवणार
दि. २ डिसेंबर २०२१ दुपारपासून महाकवी कालीदास कलामंदिर येथील संमेलन कार्यालय मेट भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक येथे हलविण्यात येणार असून पुढील तीन दिवस हे कार्यालय तेथे सुरू असेल याची नोंद घ्यावी. असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.