राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार यांचे निधन
राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोककळा

नाशिक | दि. ३ फेब्रुवारी २०२६ – Ravindra Pagar Passed Away राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते ॲड. रविंद्रनाना पगार यांचे मंगळवारी (दि. ३) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ते दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक निष्ठावंत, अभ्यासू आणि संयमी संघटक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या पार्थिवावर बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उत्राणे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सन २०१२ पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत झाली. कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे, मतभेद टाळून संघटना एकसंघ राखणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, ही त्यांची ओळख होती. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा सुमारे ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता.
ॲड. पगार (Ravindra Pagar Passed Away) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच मंत्री छगनराव भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जात. शरद पवार यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर राजकारण केले. सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर, नाशिकमध्ये सर्वप्रथम शरद पवारांच्या समर्थनार्थ मेळावा घेण्याचे धाडस ॲड. रविंद्रनाना पगार यांनी केले होते. नाशिकमधील मामा मुंगी मंगल कार्यालयात झालेला तो मेळावा आजही पक्षाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
महानगरपालिका स्तरावरही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून त्यांनी शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच आग्रही असत. प्रशासकीय कामकाजाची उत्तम जाण आणि कायद्याचे सखोल ज्ञान यामुळे त्यांचे मत निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे मानले जात होते.
त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. युवक काँग्रेस तसेच NSUI या विद्यार्थी संघटनांमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. तरुण कार्यकर्त्यांना संधी देणे, त्यांना घडवणे आणि नेतृत्वासाठी तयार करणे, हा त्यांचा कायमचा प्रयत्न राहिला. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश सरचिटणीस म्हणून तसेच विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले.
राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्यानंतर, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, नाशिक जिल्ह्यात संघटना एकसंघ ठेवण्याची मोठी जबाबदारी ॲड. रविंद्रनाना पगार यांनी समर्थपणे पार पाडली. मतभेद, नाराजी असूनही कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधत त्यांनी पक्षात फूट पडू दिली नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे संयमी, शांत आणि समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून पाहिले जात होते.
त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. “पक्षासाठी आयुष्य झोकून देणारा निष्ठावंत नेता हरपला,” अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील राजकारणात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
श्रद्धांजली!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ सहकारी ॲड. रवींद्र पगार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!पक्षाचे एक निष्ठावान व सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे व ‘नाना’ म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत आले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात, विविध निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजवली. आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी सदैव जनहितासाठी केला. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली.
त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक,अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. पगार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!
छगन भुजबळ
मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ॲपेक्स हॉस्पिटल गोविंदनगर नाशिक येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पगार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व पगार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र नाना पगार यांचे पार्थिव सकाळी उत्राने ता.बागलाण जि.नाशिक येथील त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार आहे. त्यांनतर दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


