नाशिक ( प्रतिनिधी ) नाशिकचे सुप्रसिद्ध गीतकार व कवी मिलिंद गांधी हे ३१ जानेवारी २०२२ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. गेल्या ४० वर्षांपासून नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचा सहभाग आहे. कवी कुसुमाग्रजांच्या छत्रछायेखाली तयार झालेल्या मिलिंद गांधी यांनी कविता, अनेक चित्रपटासाठी गीतलेखन, टीव्ही मालिकांसाठी शीर्षक गीते, शेकडो जाहिरातींची जिगल्स, विविध देवतांची स्तोत्रे असे विपुल व चतुरस्त्र लेखन केले आहे. त्यांच्या निवृत्तीनिमित्त ” कवी रिटायर होतोय ” या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या काव्यसंध्येच्या कार्यक्रमात सुविख्यात कवी अशोक नायगावकर, प्रकाश होळकर, संजय चौधरी व तुकाराम धांडे एका व्यासपीठावर आपल्या कविता सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन संस्कृती नाशिकच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. काव्यसंध्येचा हा कार्यक्रम सोमवार दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, तूपसाखरे लॉन्स, मुंबई नाक्याजवळ, अहिल्याबाई होळकर मार्ग येथे मर्यादित उपस्थितीत, कोरोना नियमावलीचे पालन करून आयोजित करण्यात आला असून काव्यप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष व नगरसेवक शाहू खैरे यांनी केले आहे.