ज्येष्ठ छायाचित्रकार अण्णा लकडे यांचे निधन

0

नाशिक छायाचित्रकारांचे मार्गदर्शक व जेष्ठ छायाचित्रकार तसेच नाशिक नगर पालिका उपाध्यक्ष व नाशिक शहरातील सर्पमित्र अशी नाशिक शहराला ओळख असलेले श्री. दामोदर रंगनाथ लकडे (अण्णा लकडे ) यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

अण्णा लकडे हे सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध होते. अनेक ठिकाणी मुख्यतः शासकीय निवास्थाने व कार्यालये येथे निघालेले सर्प पकडून त्यांना दूरवर सोडण्याचे काम ते विनामूल्य करीत होते . सर्प दंश झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले. नागीण रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींवर योग्य उपचार करून अनेकांना त्यांनी बरे केले.

अण्णा हे उत्कृष्ट जलतरणपटू होते. ९ सप्टेंबर १९६९ च्या महापुरात त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचविले. शिवसेना स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या पहिल्या फळीचे ते शिवसैनिक होते. महापुरातील त्यांच्या कामकाजानंतर रविवार कारंजा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. तेथे शिवसेनाप्रमुखांनी अण्णांचा विशेष सत्कार केला होता.

एक कार्यक्षम नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले. जुन्या काळातील वॉर्ड नंबर ४ मधून ते विजयी झाले होते. त्यांच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांनी संप केला असतांना त्या काळात असलेले टोपली संडास त्यांनी स्वतः हाताने स्वच्छ केले. काही काळ ते उपनगराध्यक्षही होते. त्यांच्या समाज सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.

त्यांची अंत्ययात्रा आज दि.३० जानेवारी दुपारी ३ वाजता. त्यांच्या निवासस्थान काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा श्रीराम अपार्टमेंट पंचवटी येथून निघणार आहे व पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.अशी माहिती छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांनी दिली आहे.

जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने १९ ऑगस्ट २०२१ जेष्ठ छायाचित्रकार अण्णा लकडे यांचा नाशिकच्या छायाचित्रकार संघटने तर्फे यांचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.