१ डिसेंबरला पहिलीपासून शाळा सुरू होणार : शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नाशिक शहरातील शाळांचा निर्णय १० डिसेंबर नंतर 

0

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण आवश्यक

मुंबई येत्या १ डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे.

उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.178/एसडी-6, दि. 29 नोव्हेंबर 2021 पहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील शाळांचा निर्णय १० डिसेंबर नंतर 

नाशिक शहरातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु करणे प्रस्तावित होते. परंतु कोविड- १९ च्या नवीन विषाणूचा धोका लक्षात घेता नाशिक शहरातील सर्व शाळांमधील इ. १ ली ते ७ वी चे वर्ग सुरु करण्याबाबतचा निर्णय १० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. इयत्ता ८ वी चे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. अशी माहिती मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.