निवृत्त उपजिल्हाधिकारी कवी देविदास चौधरी यांच्या कवितासंग्रहाचे बुधवारी प्रकाशन

0

नाशिक – निवृत्त उपजिल्हाधिकारी कवी देविदास चौधरी यांच्या सोप्पंय सगळं या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा बुधवार १ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता शालीमार येथील कालिदास कलामंदिर येथे जेष्ठ कवी, चित्रकार व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुसुमाग्रज स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंतराव टकले, प्रमुख अतिथी कवी समीक्षक एकनाथ पगार, कवी अरुण म्हात्रे, विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकुर, कवी, अभिनेते किशोर कदम – सौमित्र, कवयित्री सुनंदा भोसेकर, कवी समीक्षक दा.गो.काळे, कवी संचालक कॅापर कॅाईन पब्लिशिंग सरबजीत गरचा, कवी संपादक हेमंत दिवटे हे उपस्थितीत राहणार आहे.

नाशिक जिल्हयातील मनमाड जवळ असलेल्या कुंदलगाव येथील रहिवाशी असलेले देवीदास चौधरी हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून ते सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहे. रिझर्व्ह बँक, पोलिस अधिकारी,तहसीलदार, उपजिल्हाधिकारी असा त्यांचा नोकरीतील प्रवास आहे. या अगोदर ‘तसा काही अर्थ नाही’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिध्द झाला आहे. साहित्य कलांची उत्तम जाण असलेले चौधरी हे जेष्ठ समीक्षक कै. म.सु.पाटील यांचे विद्यार्थी आहे. खेड्यातून येणं, मातीशी घट्ट नाळ असणं, तटस्थपणे जगण्याकडे पाहण्याची दृष्टी, समकालावर नेमकेपणाने भाष्य करणे आणि मिश्किल दिलखुलासपणे बोलणा-या या कवींचा साहित्य वर्तूळात राज्यात मोठा मित्र परिवार आहे.

नोकरी निमित्त मुंबईत राहिल्यामुळे अनेक भारतीय, जागतिक कलामहोत्सवात जाणे, पुस्तकचर्चा यामुळे त्यांची सकस अभिरुचीची जमीन तयार झाली आहे. त्यांच्या अनेक कविता नियतकालिके ,अनियतकालिकात प्रकाशित झाल्या आहे. या कवितेतूनच गावाकडचा अस्सल भाषा घेऊन आलेला कवी म्हणून त्यांचा उल्लेख होऊ लागला. त्यांच्या याच सर्व कविता एकत्र करून हेमंत दिवटेने अभिधानंतर प्रकाशनाने ‘तसा काही अर्थ नाही’ हा चौधरी यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला.

या कवितासंग्राहाचे मान्यवर अभ्यासकांनी कौतुकही केले. त्यानंतर १५ -१६ वर्षांनी कॉपर कॉइन प्रकाशनातर्फे .’सोप्पंय सगळं’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. वास्तवात आक्रोश ,कोलाहल भरून आहे, पडझड सुरू आहे या तडा गेलेल्या वर्तमानाकडे हा कवी संयतपणे बघतो आणि भाष्य करतो हे या नव्या कविता संग्रहात आहे. त्यांच्या कविता अस्तित्वावर जोरकस हल्ला करतात. ९४ व्या मराठी साहित्य संमेलनच्या अगोदर हा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा होत आहे. त्यामुळे या सोहळयाला सर्वांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन निमंत्रक प्रकाश होळकर, राजू देसले, मंगेश काळे, गौतम संचेती, समृध्द चौधरी, दिल्ली येथील कॅापर काईन पब्लिशिंग यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.