सोलापूर – शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे आज (शुक्रवारी)रात्री नऊच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तब्बल ५० वर्ष त्यांनी विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली होती.त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर ते तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. ते ५० वर्षांहून अधिक काळ विधानसभेचे सदस्य राहिले होते .याच काळात त्यांनी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला.
विधेयकांच्या चर्चेत सहभागी होऊन अभ्यासू संसदपटूची ओळख निर्माण करत सभागृहात त्यांनी आदर्श निर्माण केला होता.त्यांच्या निधनाने एक अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं आहे. मी व माझे कुटुंबीय देशमुख कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात शेवटी म्हटलेले आहे.