स्वानंद बेदरकर संपादित ‘शब्द कल्पिताचे.’ या ग्रंथाचे आज प्रकाशन
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो, अरुणा ढेरे, मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक,२४ मार्च २०२३ – ‘शब्दमल्हार प्रकाशन’च्यावतीने स्वानंद बेदरकर संपादित ‘शब्द कल्पिताचे…’ या ग्रंथाचे प्रकाशन आज शुक्रवार दिनांक २४ मार्चला होत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून ख्यातनाम साहित्यिक अरुणा ढेरे यांची सन्माननीय उपस्थिती या प्रकाशन सोहळ्यास लाभणार आहे.
गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ग्रंथावर भाष्य करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत.
मराठी साहित्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘शब्द कल्पिताचे…’ या ग्रंथाची संकल्पना आणि संपादन स्वानंद बेदरकर यांचे असून ‘पत्र’ हा वाङ्मयप्रकार या ग्रंथासाठी वापरण्यात आला आहे. आज आपल्यात नसलेल्या परंतु ज्यांच्या कामाचा अमीट ठसा काळावर उमटलेला आहे अशा विविध क्षेत्रातील भूतकाळातील पन्नास व्यक्तींना आजच्या महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींनी लिहिलेली पत्रे असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
मराठी वाङ्मय विश्वातील हा पहिलाच प्रयोग असून ग्रंथाला बेदरकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. मराठी साहित्यात अशा प्रकारचे वेगळे आणि ऐतिहासिक काम नाशिक मधून उभे राहात असल्यामुळेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो यांची उपस्थिती या प्रकाशन सोहळ्याला लाभणार आहे. यानिमित्ताने मावजो हेदेखील पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत असून त्यांच्या बरोबरच अरुणा ढेरे, मिलिंद जोशी यांना ऐकण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘शब्दमल्हार प्रकाशन’तर्फे करण्यात आले आहे.