नाशिक पूर्व मधून भाजपाला धक्का :मा.स्थायीसमिती सभापती गणेश गीते यांनी हाती घेतली “तुतारी”
नाशिक पूर्व मधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार : सिन्नरचे उदय सांगळे यांचाही शरद पवार गटात प्रवेश
नाशिक,दि,२२ ऑक्टोबर २०२४ –नाशिक पूर्व मतदार संघात भाजपाला जोरदार धक्का बसला असून माजी स्थायीसमिती सभापती तसेच माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात मुंबईत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे सिन्नर मधून उदय सांगळे हे देखील आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत
गणेश गीते गेले वर्षभर नाशिक पूर्व मधून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. त्याबाबत वरिष्ठांशी त्यांचे बोलणे देखील झाले होते. भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पक्षाने पुन्हा संधी दिल्याने नाराज गीते यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक पूर्व मतदार संघ शरद पवार गटाकडे असल्याने आता भाजपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्यात थेट लढत होणार आहे.
गणेश गीते यांच्या प्रवेशा नंतर सायंकाळी त्यांचे नाशकात आगमन होत असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.