मुंबई – जगभरासह देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे.सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची जल्लोषी तयारी सुरू आहे. तसेच सगळीकडे नाताळच्या सेलिब्रेशनचीही जोरदार धूम बघायला मिळते आहे. या निमित्ताने गर्दोचे चित्र दिसत आहे. या गर्दीत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची प्रचंड भिती आहे.कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढल्यानंतर ऑक्सिजनची गरज भासणार आहे. प्रसंगी ऑक्सिजनचा तुटवडाही भासू शकतो. ऑक्सिनच्या अनुषंगाने राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, असे महत्वपूर्ण विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी पाचशे ते सहाशे रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४०० च्या वर गेली आहे. त्यात ओमायक्रॉनचे रुग्णही १०० च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी यावेळी केले.
आम्हाला निर्बंध लावायचे नाही. तसा आमचा हेतू नाही. फक्त जनतेच्या काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावे, असेही आवाहन टोपे यांनी केले आहे.देशभरात तसेच राज्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. अशातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचाही संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.