राज्यात आज पासून कोरोनाचे कडक निर्बंध लागू
नाशिकमध्ये राज्य सरकारचे निर्बंध जसेच्या तसे लागू - जिल्हाधिकारी सुरज मांढरे
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात मध्यरात्री पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे.तसेच पर्यटनस्थळावर जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जाहीर केलेले आधीचे निर्बंधही कायम राहणार आहेत.
काल राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून २४ तासांत ५ हजार ३६८ रुग्ण तर एकट्या मुंबईत तब्बल ३ हजार ९२८ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यात काल तब्बल १९८ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून त्यापैकी १९० रुग्ण एकट्या मुंबईतून आहेत. हि बाब अत्यंत चिंताजनक आहे.
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहे. आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आलेत. केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावी लागणार आहेत.
अंत्यसंस्कारांना केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. पर्यटन स्थळं, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणं अशा ठिकाणी निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत. मात्र दुकानं, मॉल, सिनेमागृह यांविषयी अजून आदेश जारी झालेले नाहीत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमालीची वाढत आहे. ओमायक्रॉनबाधितांसह कोरोना रूग्णांचे आकडे रोजच वाढत आहेत. त्यामुळे सरकारने अखेर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये राज्य सरकारचे निर्बंध जसेच्या तसे लागू – जिल्हाधिकारी सुरज मांढरे
राज्याने घेतलेला निर्णय जसाच्या तसा नाशिक जिल्ह्याला लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हटले आहे. राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार सांस्कृतिक, धार्मिक ,राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.