नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून जगभरासह देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्यानं सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत.. याबाबतचं पत्रच केंद्रानं राज्य सरकारांना लिहिलंय.देशातील १४ राज्यांमध्ये आत्तापर्यंत २२० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्य़ा पाहता केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून संसर्ग रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रात केंद्राने प्रत्येक राज्याला ओमायक्रॉनसाठी वॉर रुम सक्रिय करण्याचाही सल्ला दिला आहे.
राज्यांनी नाईट कर्फ्यूसह आणखी काही कडक नियम लागू करण्याचा सल्ला केंद्रानं दिलाय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना चाचण्या आणि रुग्णांवर लक्ष ठेवा. मोठ्या मेळाव्यांवर बंदी घालावी, लग्न, अंत्यविधींमधील लोकांची संख्या मर्यादित करणे यासारखी पावलं उचलली जावीत. त्याचप्रमाणे खासगी आणि सरकारी ऑफिसमध्ये उपस्थितीची मर्यादा आणि सार्वजनिक वाहतुकीवरही काही निर्बंध घालण्याबाबत केंद्रानं राज्यांना सूचना केल्या आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत तिप्पट संसर्गजन्य आहे. त्यामुळे कोरोनासंबंधीत अपडेट्सवर लक्ष ठेवून स्थानिक आणि जिल्हा स्तरावर कठोर आणि जलद पावलं उचलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.या उपायांमुळे संसर्ग कमी होण्यास नक्कीच मदत होईल. असेही सांगितले.त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनची निवड, चाचणी, ट्रॅक आणि पाळत ठेवण्यावर भर देण्याचा सल्लाही या पत्रात दिला आहे. तसेच राज्यांना घरोघरी केस शोधणे, यासोबतच आरटी पीसीआर चाचण्यांची संख्याही वाढवायला हवी. सर्व कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग करावे. याशिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवरही जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे.असे सांगण्यात आले आहे.