आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संगीताची मैफल चालू असताना मध्येच सतारीची तार तुटली किंवा गाता गाता गायकाचे शब्द गळ्यातच अडकले तर त्या दुर्दैवी क्षणी प्रेक्षकांचा हिरमोड होतो आणि नंतर “तो क्षण” तीन तासांच्या मैफिलीवर तर भारी पडतोच पण त्या गायकाची, त्या वादकाची आयुष्यभराची मेहनत ‘त्याक्षणी’ शून्य होते. हीच मेहनत, हेच कष्ट आयुष्यभर पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी घेत असतो, पण दुर्दैवाने आपल्या जीवन संगीतातले सप्तसूर जर हलले तर मुलांचं जीवन गाणं बेसूर होतं.मागच्या लेखात आपण जीवन गाण्यातील पहिले तीन सुर पाहिले. सा सामंजस्याचा, रे रेक्गनीशन आणि रेडीनेसचा, ग गमतीजमतीचा, आता पुढचा सुर बघूया.
म मनाच्या मोठेपणाचा
आयुष्यात अनेक वेळा तडजोडी कराव्या लागतात. कित्येकदा मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. मनात नसताना आपली एखादी गोष्ट दुसऱ्याला द्यावी लागते. या वेळी होणारा मनस्ताप भयानक असतो म्हणूनच आपल्या मुलांमध्ये मनाचा मोठेपणा कसा येईल? हे आपण आवर्जून बघायला हवे. खजील होण्याची परिस्थिती मुलांवर कधीच येणार नाही याची खात्री देता येत नाही पण ‘समोर आलेल्या परिस्थितीवर मनाचा मोठेपणा दाखवून मात करता येते’ ही शिकवण अनेक गोष्टींमधून आपण मुलांना देऊ शकतो. ‘आपलं मन मोठे आहे’ हे दाखविण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. कधीतरी, कोणीतरी, आपल्याला दुखावतं तेव्हा मोठ्या मनाने त्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. कोणीतरी आपल्याला आवडणारी वस्तू आपल्याकडे मागतं तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून कुठलीही नाराजी न दाखवता ती वस्तू आपल्याला देता आली पाहिजे. कोणी भांडण उकरून काढलं आणि आपल्याला दोन चार शब्द सुनावले तरी ‘त्याची मनस्थिती कदाचित ठीक नसेल’ असा विचार करून शांत बसण्यात मनाचा मोठेपणा असतो हे ही मुलांना शिकवायला हवं. गांधीजींची एक गोष्ट तुम्हाला सांगते.
महात्मा गांधी बोटीमधून इंग्लंडला चालले होते. त्याच बोटीत बसलेला एक युरोपियन प्रवासी अधून मधून त्यांची टिंगल करत होता. मध्येच अपशब्दही वापरत होता. मात्र गांधीजींनी त्या युरोपियन प्रवाशाची कुठलीही दखल घेतली नाही. गांधीजींचा शांतपणा बघून युरोपियन प्रवासी विचलित होत होता. शेवटी त्याने गांधीजींवर हास्यकविता केली आणि ती कविता कागदावर लिहून गांधींची फजिती करावी म्हणून सहप्रवाश्यांच्यासमोर ती गांधीजींच्या हातात दिली. टाचणी लावलेले चार-पाच कागद हातात आल्यानंतर गांधीजींनी प्रश्नार्थक मुद्रेने त्या युरोपियन प्रवाशाकडे पाहिले. त्यावर “मी तुमच्यावर हास्यकविता केली आहे जरूर वाचा. गांधीजी, तुमची चांगलीच करमणूक होईल. त्यात तुम्हाला घेण्यासारखं बरंच काही आहे” असं म्हणत तो प्रवासी कुचकटपणे हसायला लागला.
गांधीजींनी ते कागद हातात घेऊन त्यांना लावलेली टाचणी काढून ठेवली आणि कागद सरळ समुद्रामध्ये भिरकावून दिले. गांधीजींचे हे कृत्य बघून रागावलेल्या त्या प्रवाश्यानं गांधीजींना विचारलं,”कागद फेकून का दिलेत? मी इतक्या मेहनतीने तुमच्यावर काव्य लिहिलं होतं तर ते वाचायचं होतं ना! त्यात तुम्हाला घेण्यासारखं बरंच होतं.” त्याच्या या वक्तव्यावर बाजूला ठेवलेल्या टाचणीकडे बोट दाखवून गांधीजी म्हणाले,” महाशय जे घेण्यासारखं होतं ते घेतलंच आहे आणि जपूनही ठेवलं आहे. या व्यतिरिक्त त्या कागदांमध्ये इतर कुठलीही गोष्ट घेण्यासारखी नव्हती.” असं उत्तर देऊन गांधीजी शांतपणे तिथून निघून गेले. ठरवलं असतं तर त्या युरोपियन प्रवाशाचा अपमान करून किंवा तिथेच त्याला दोन चार शब्द ऐकवुन हा ‘खटला निकाली’ निघाला असता, शेवटी गांधीजीपण बॅरिस्टर होते मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत तो प्रसंग निभावला. त्यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाने त्यांना असामान्य ठरवलं. अन्यथा गोऱ्या प्रवाशांनी भरलेल्या त्या बोटीवर गांधीजी हे देखील इतर प्रवाशांना सारखे सामान्य ठरले असते.
वेळ निघून गेल्यानंतर कधी तरी आपण विचार करतो की ‘फार छोट्या छोट्या गोष्टींवर आपण उगीच प्रतिक्रिया देत बसलो त्यावेळी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर मामला बिघडला नसता’. हरकत नाही , पुढच्यास ठेच मागचा शहाणा असं म्हणूया आणि आपल्या मुलांना तरी मनाचा मोठेपणा दाखवण्याचं महत्त्व पटवून देऊया. लक्षात ठेवा, जीवनसंगीतातला चौथा सुर ‘म आहे मनाच्या मोठेपणाचा!’
पाचवा सूर आहे प
प पारदर्शकतेचा
पाणी जेव्हा स्वच्छ, नितळ असतं तेव्हा ते “जीवन” असतं. त्यात माती मिसळली की ते गढूळ होतं. कालांतराने त्यातली माती खाली बसायला लागते पण ते पाणी पूर्वीइतकं नितळ, पारदर्शक कधीही होत नाही. हलक्याशा धक्क्यानेसुद्धा खाली बसलेला गाळ उसळी मारतो आणि परत एकदा पाणी गढूळ होतं. असंच आपल्या नात्यांचंही असतं. नातं जितकं पारदर्शक असेल तितकच ते शुद्ध असतं, त्यात राग लोभ, रुसवे-फुगवे, समज- गैरसमज यांना जागाच नसते. जर नात्यातली ही पारदर्शकता हरवली तर मात्र गैरसमजाचा प्रवेश होतो ज्याने नातं गढूळ होत जातं. एक गैरसमज मिटवला तरी लगेचच तिथे दुसरा गैरसमज निर्माण होतो आणि नात्याचं पाणी कायम गढूळ रहातं. आपलं मुलांसोबतच नातं स्वच्छ असण्यासाठी, मुलांना आपल्याबद्दल विश्वास वाटण्यासाठी, आपल्या आणि मुलांच्या नात्यात पारदर्शकता अतिशय महत्त्वाची आहे.
ज्या गोष्टी मुलं झोपल्यानंतर हळू आवाजात आपण सहचारिणीशी बोलतो, त्या गोष्टी जर शक्य असेल तर मुलांना समोर बसवून त्यांच्याही कानावर घालाव्यात. जेणेकरून घरात काय परिस्थिती आहे , त्या परिस्थितीचा आपल्या आईवडिलांच्या मानसिकतेवर नक्की काय परिणाम झाला आहे ? याची कल्पना मुलांना येते. ही कल्पना मुलांना देणं अतिशय आवश्यक असतं. नाहीतर, आपल्या कृतीमागचे अर्थ समजावून न घेता मुल गैरसमज करून घेतात आणि परत एकदा आपल्या आयुष्यात संगीताच्या मैफिलीत सतारीची तार तुटण्याचा तो क्षण येऊ शकतो. आपण त्यांच्यासाठी त्या मिनिटापर्यंत केलेले कष्ट मुलं सोयीस्कररित्या विसरतात. भविष्यात प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवून आपल्याला दोष लावायला ही मुलं कमी करत नाहीत. हे होऊ द्यायचं नसेल तर नात्यांमध्ये पारदर्शकता असण्याचा आग्रह धरायला हवा.
आजच पालकांशी बोलताना मुलांना आपल्या कष्टांची जाणीव का नसते? हा एक कॉमन मुद्दा चर्चेला आला ज्यात माझी बाजू जरा वेगळी होती. ‘आमच्या मुलीला आमच्या कष्टांची नुसती जाणीवच नाही तर किंमतही आहे’ हे सांगितल्यावर बाकी पालक “तुम्ही नशीबवान आहात” या अर्थाचं काहीतरी बोलले. त्यांचं हे वैषम्य मी समजू शकते. कालच त्यांच्यापैकी एकीच्या मुलाने डे केअरच्या दप्तरात टिफिन नव्हता म्हणून आकांडतांडव केलं होतं. हमसून हमसून रडणारा तो चार वर्षाचा मुलगा दप्तरात टिफिन नसण्यासाठी त्याच्या आईला जबाबदार धरत होता. रडतानाही दात ओठ खाऊन “आत्ताच्या आत्ता मम्मीला फोन कर आणि टिफीन आणायला सांग’’ असं वारंवार मला सांगत होता. फोन केल्यावर जेव्हा त्याची आई आली तेव्हा तो आईच्या अंगावर धावून गेला, तिच्या पोटावर फटके मारून “मला टिफिन का नाही दिला“ असं रागारागाने विचारू लागला. आईने त्याचं दप्तर तपासलं आणि तपासता तपासता म्हणाली,”टिफिन भरून मी तुझ्या हातात दिला होता आणि तुला तुझ्या हाताने दप्तरात ठेवायला सांगितला होता. आता तू टिफिन ठेवला नाहीस ही कुणाची चुक आहे?” त्यांनी असं म्हटल्यावरसुद्धा मुलाचा संताप काही कमी होत नव्हता. या प्रसंगाने आज त्या विचलित होत्या. खरंतर आजचे स्त्री पालक सुद्धा उच्चशिक्षित असतात पण मुलांसाठी करिअर बाजूला ठेवून मुलांकडे पूर्ण लक्ष देत असतात. अशा वेळेस त्याच मुलांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आई-वडिलांना बोल लावले तर त्यांना अतिशय वाईट वाटतं. हे सगळे प्रसंग आणि त्यातून कायम आई-वडिलांना येणारा वाईटपणा टाळण्यासाठी नात्यांमध्ये पारदर्शकता असावी असं मला वाटतं. यासाठी पाचवा सूर ‘प आहे पारदर्शकतेचा!’
पुढचा सूर आहे ध,
ध (धमकीचा नाही) धमकचा, धनाच्या नियोजनाचा
(मुलांना धमकी देऊन आपण त्यांच्याकडून काहीही साध्य करू शकत नाही. धमक्या देण्याने मुलांचा किंवा आपला कुठलाच फायदा होत नाही.) धमक आणि धनाचं नियोजन हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत असं मला वाटतं. ज्याच्या अंगी धमक असते तोच धन कमावतो आणि मग याच कमावलेल्या धनाच नियोजन करण्यासाठी कौशल्य लागतं. सोशल मीडियावर एक मेसेज कायम वाचायला मिळतो “शौक तो माँ बाप के पैसे से पुरे होते है ! खुद के पैसों से सिर्फ जरुरते पुरी होती है|” या वाक्यातील गंमत कधी ना कधी मुलांना कळतेच. जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावे या अट्टाहासाने आपण जीवाचा आटापिटा करून मुलांसाठी खूप काही करतो. वेळोवेळी त्यांना पैसे देऊन त्यांच्या आवडीच्या वस्तू घेण्याची परवानगी देतो. हिशोब मागितला तर अविश्वास आहे असं मुलांना वाटेल म्हणून इच्छा असूनही त्याचा हिशोब मागत नाही. हातात असणारा आई-वडिलांचा पैसा आणि तो पैसा वाटेल तेथे, वाटेल तसा खर्च करण्याची मुभा मुलांना दिली तर त्यांना कधीही ‘ते पैसे कमावण्यासाठी आपण केलेल्या कष्टांची जाणीव’ होणार नाही. माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट सांगते.
एक मोठा व्यापारी होता. अरबोपती असणारी ही व्यक्ती ‘शून्यातून वर’ आलेली होती. त्याच्या एकुलत्या एक मुलाला पैशाची अजिबात किंमत नव्हती. हातात आलेला पैसा उडवणं यात त्याला काहीच गैर वाटत नव्हतं. लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी वडिलांनी केलेले काबाड कष्ट, अपार मेहनत याची त्याला कल्पनाही नव्हती. एका मर्यादेनंतर त्या व्यापाऱ्याला मुलाच्या वागण्याचा खेद वाटायला लागला होता. ‘या मुलाला पैशाची किंमत कशी कळेल?’ याचा विचार तो व्यापारी रात्रंदिवस करत होता. एक दिवस जेवता जेवता काहीतरी विषय निघाला आणि विषयाची गाडी ‘पैसा आणि पैशाची किंमत’ या दिशेने गेली. व्यापाऱ्याला आयतीच संधी चालून आली. गप्पा मारता मारता “पैसे कमावणं किती अवघड आहे?” हे तो त्याच्या मुलाला सांगू लागला. त्याचा मुलगा कसला ऐकतोय? तो म्हणाला, “ह्यॅ, सोप्पं तर असतं पैसे कमावणं. मी सहज पैसे कमवू शकतो!” व्यापार्या ला हेच हवं होतं. व्यापारी लगेच म्हणाला,” खरंच? मग उद्या तू मला शंभर रुपये कमावून दाखव” मस्ती मस्तीत मुलानेही आव्हान स्वीकारल. सकाळी सकाळीच व्यापाऱ्यानी शंभर रुपये कमावण्याची आठवण करून दिल्याने मुलगा तावातावाने घराबाहेर पडला.
मनातल्या मनात वडिलांबद्दल खूप राग, चिडचिड घेऊनच तो काकांकडे पोहोचला. काय झालं ते काकाला सांगितलं. काकाने विचारलं,” बर, मग आता शंभर रुपये कसे कमावणार आहेस?” त्यावर मुलगा म्हणाला,”काका तू देशील ना मला शंभर रुपये तेच मी बाबांना नेऊन देईल. त्यात प्रश्न पडण्यासारखं काय? तेवढ्यासाठी मी आलोय तुझ्याकडे! पटकन मला शंभर रुपये दे बरं” काकांनी शंभर रुपयांची नोट मुलाच्या हातात ठेवली. मुलाने तडक घर गाठलं आणि ते शंभर रुपये वडिलांच्या हातात ठेवले, इतक्या लवकर शंभर रुपये आणलेले बघून ‘याला कोणी तरी मदत केली आहे’ हे वडिलांना समजल. त्यांनी ते पैसे दान पात्रात टाकून दिले. मुलाला वाटलं ‘झालं संपली परीक्षा!’ दुसऱ्या दिवशी वडिलांनी परत मुलाला शंभर रुपये कमावून आणायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आत्यानी मदत केली. तेही शंभर रुपये दान पात्रात गेले. तिसऱ्या दिवशी आईने मदत केली, तेही शंभर रुपये दान पात्रात गेले. मुलानी वैतागून विचारलं, “मी रोज शंभर रुपये आणतो आहे आणि तुम्ही ते शंभर रुपये मला खर्चायला न देता दान पात्रात टाकत आहात? मला दुसरे पैसे ही देत नाही असं कसं चालेल?” वडिलांनी सांगितलं, “कोणाकडं मागून आणलेले पैसे हे भीकेसमान असतात. ते सत्कारणी लागावे म्हणून मी ते दान पात्रात टाकतो आहे.
मला तुझ्या स्वकमाईचे, तुझ्या कष्टाचे शंभर रुपये हवे आहेत. ते आज कमावून आण.” आता मात्र मुलगा अतिशय वैतागला. आजही रागारागाने घराबाहेर पडला. “हे मला अगदीच कुचकामी समजतात वाटत. आज मी यांना पैसे कमावून दाखवणारच!” असं त्याने मनाशी ठरवलं पण काम कुठलं करायचं हेच त्याला सुचत नव्हत. पूर्ण दिवस असाच गेला. संध्याकाळी ‘घरी जाण्याआधी काहीतरी पैसे कमवायला हवेत’ या विचाराने तो झपाटला, तेवढ्यात समोरून एक माणूस मोठी बॅग घेऊन चालला होता. ती मोठी बॅग त्याला पेलवत नव्हती. हे बघून कमवण्याची आयती संधी आली असं त्या मुलाला वाटलं. तो पुढे गेला, त्या माणसाकडून काही पैशांच्या मोबदल्यात ती बॅग जागेवर पोचवण्याचं ठरवून घेतलं आणि बॅग घेऊन निघाला. त्याला सुद्धा खरंतर या कष्टांची सवय नव्हती पण प्रश्न आता पैसे कमवण्याचा होता. ‘काहीच न कमवता घरी गेलो तर प्रवचन ऐकावे लागेल त्यापेक्षा निदान काहीतरी पैसे घेऊन जावे’ असा विचार तो मुलगा करत होता. ती बॅग इच्छित स्थळी पोहचवल्यानंतर त्या माणसाने या मुलाला तीस रुपये दिले. ‘काही नाही पेक्षा हे बरे’ असा विचार करून तो मुलगा घरी गेला आणि ते तीस रुपये त्याने वडिलांच्या हातात दिले. वडिलांनी ते पैसे दान पात्रात टाकण्याकरिता हात पुढे नेताच मुलगा खूप चिडला. “बाबा, हे तीस रुपये कमवण्यासाठी आज मी भरपूर कष्ट केले आणि तुम्ही माझ्या कष्टांची किंमत दानपात्रात टाकत आहात? हे कमवण्यासाठी मला काय काय करावं लागलं ते मलाच माहिती!” एकंदरीत मुलाची अवस्था बघून आज त्याने काहीतरी कष्टाचं काम केलेल आहे, हे वडिलांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी ते तीस रुपये देवासमोर ठेवले आणि मनोभावे देवाला नमस्कार केला.
मुलाला त्यांच्या या कृतीचं आश्चर्य वाटलं. ‘रोज मी इतके पैसे आणत होतो ते सर्व दानपात्रात जात होते आणि आज मी कष्टाचे पैसे आणले म्हटल्यावर यांनी ते देवापुढे ठेवले?’ वडिलांना मुलाच्या मनातला संभ्रम कळला. ते म्हणाले, “बाळा, आज तुला कष्टाची किंमत कळली आणि म्हणून तुझ्या मेहनतीचे पैसे दानपात्रात न टाकता देवापुढे ठेवणच उचित होतं. रोज तू शंभर रुपये आणलेस पण ते भिकेसमान होते. आज तू शंभर रुपयांची अट पूर्ण करू शकला नाहीस, तीस रुपये आणले. हे तीस रुपये लाख मोलाचे आहेत बाळा!” त्यादिवशी व्यापाऱ्याच्या मुलाला पैशाची खरी किंमत कळली. वडिलांनी दिलेले हजार रुपये उडवतांना क्षणभराचाही विचार न करणारा मुलगा, हे तीस रुपये खर्च करतांना विचार करणार होता. प्रत्येक वेळेला त्या तीस रुपयामागची मेहनत त्याला आठवणार होती म्हणूनच हे तीस रुपये अनाठाई खर्च होणार नाहीत याची व्यापाऱ्यालाही खात्री होती.
आपणही आपल्या मुलांना पैशाची किंमत, पैशाचे महत्व, छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकवत राहायला हवं, जेणेकरून मुलांच्या हातात गेलेला पैसा खर्च करताना ते सारासार विचार करतील, पैशाचा अपव्यय टाळता येईल. यावर्षी आमच्या लेकीची दहावी झाल्यानंतर आम्ही तिला “एकुलती एक असूनही” स्व कमाईच्या संधी शोधायला लावल्या. तिच्या मोबाईलचा रिचार्ज, ती वापरत असलेल्या गाडीचा मेंटेनन्स, पेट्रोल, हे सगळं भागवण्यापुरते पैसे तिने कमवावे असा आमच्या दोघांचाही आग्रह होता. कुठल्याच कामाची लाज वाटू नये आणि कुठलंही काम छोटं नसतं हे शिकवण्याची ही एक उत्तम संधी होती. त्याशिवाय मोबाईल रिचार्ज, पेट्रोल, गाडीचा मेंटेनन्स हे सगळे खर्च भागवण्यासाठी जे पैसे लागतात ते कमवण्यासाठी कष्ट असतात, त्याची जाणीव तिला या वयात व्हायला हवी हा प्रामाणिक हेतू होता. आमच्या लेकीनेसुद्धा ‘मी एकुलती एक असून तुम्ही माझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का?’ असा प्रश्न न करता आमच आव्हान स्वीकारलं आणि पेपर संपल्या दिवसापासून ती आमच्या शाळेमध्ये स्टाफ म्हणून जॉईन झाली. माझी मुलगी म्हणून तिला कुठलीही सवलत मिळत नाही. सुट्टीच्या दिवसाचा पगार कापला जातो. तरीही कुरकुर न करता ती उत्साहाने काम करते. मला वाटतं हाच खरा शुद्ध सूर आहे, ध धमक काहीतरी करून दाखवण्याची आणि ध धनाच्या नियोजनाची! ही योग्य सुरुवात आपल्या मुलांना व्यवहारी तर बनवेलच त्याही पेक्षा जास्त जबाबदार बनवेल. ‘ध हा सुर धमक आणि धनाच्या नियोजनाचा!’
जीवन संगीताबरोबरच आपल्या नात्यांमध्ये सहा सुर आपण पाहिले. या सुरांनी माझा जीवन गाणं सूरेल झाले आहे तसंच तुमचंही व्हावं,या सदिच्छांसह आता शब्दांना विराम देते शेवटचा सूर आणि या सगळ्याचं सार याचा पुढच्या लेखात विचार करूया.
क्रमशः
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524