सूर तेच छेडीता

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक) 

 
एखाद्या कातरवेळी अगदी मनातल्या भावना प्रकट करणारं गाणं लागतं आणि असं वाटतं की कोणीतरी आपल्याला समजून घेतंय. आपल्याला शब्दांत सांगता येत नसतं ते संगीतातून प्रकट होतंय. संगीतकारांचं ‘भावना नेमक्या शब्दात मांडण्याचं कसब’ म्हणजे दैवी देणगी असावी असं मला कायम वाटतं. आपला प्रत्येक दिवस, आपला प्रत्येक क्षण हा देखील संगीतासारखा लयबद्ध असतो असंही मला वाटतं.


संगीतात जसे सात सूर असतात,  तसेच सात सूर आपल्या नात्यांमध्येही असतात. त्यांचा समतोल साधला तर जीवनगाणं सुरेल होतं पण जर एखादा सूर मध्येच चुकीचा लागला तर मात्र बेसूर वाटणारं जीवन गाणं आपलं ‘जगणं भेसूर’ करू शकतं.
जीवनगाण्याचे हे सात सूर एकमेकांमध्ये गुंफले तर नात्यांचे सुरेल रेशीम बंध तयार होतात.

अर्थातच पहिला सुर “सा”


सा सामंजस्याचा


आपल्या नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची ताकद हवी. मुलांच्या कृतीतून त्यांच्या मनात नक्की काय चाललं असेल ? हे जर आपण समजून घेतलं आणि त्या अनुषंगाने आपली वागणूक ठेवली तर आपली मुलंही आपल्याला समजून घ्यायला लागतात. त्यांना आपलेपणा वाटतो, आपला अभिमान वाटतो, ते ही सामंजस्याचा पुरस्कार करतात आणि हे सामंजस्य एक दोन दिवसांपुरत नाही तर आयुष्यभरासाठी त्यांच्या मनावर कोरलं जातं.


नात्यात जर सामंजस्य असेल तर आपली मुलं किती उच्च पातळीवर घडू शकतात याचं उदाहरण सांगते. अब्राहम लिंकन यांचा जन्म अमेरिकेतील कींटूकी शहरात सामान्य कुटुंबात झाला. अब्राहम आणि त्याची बहीण घरकाम, शेतकाम करीत असत. दोन मैल लांब असलेल्या शाळेमध्ये चालत चालत जात असत. कितीतरी वेळा वाचनाची आवड असलेला आब्रहम झाडाच्या सावलीत मिळेल ते पुस्तक वाचत बसलेला दिसे. एकीकडे त्याची आई, वडील आणि बहीण उन्हातान्हात शेतात राबत असतांना, झाडाच्या सावलीत पुस्तक वाचत बसलेला लिंकन जरासुद्धा विचलित होत नसे. अशा वेळेला त्याच्या पाठीत रट्टा घालून “गाढवा, इथे आम्ही सगळे मरेस्तोवर काम करतोय आणि तू मात्र सावलीत बसून पुस्तकं वाचतोय?” असं न म्हणता, स्वतः मातीची मशागत करून, अब्राहमला त्याच्या बुद्धीची मशागत करण्याची प्रत्येक संधी देण्याइतकं सामंजस्य अब्राहमच्या पालकांकडे होतं. त्यांनी प्रत्येक वेळी त्याच्या आवडीनिवडीचा, त्याच्या निर्णयाचा आदर ठेवला म्हणूनच अब्राहम लिंकनलाही त्याचे पालक वंदनीय झाले. 

 

लिंकन अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर सिनेटमध्ये त्यांचं पहिलंवहिलं भाषण होतं.भाषणासाठी लिंकन उभे राहिले असता स्वतःला अतिश्रीमंत समजणारा एक गृहस्थ लिंकन यांना उपहासाने म्हणाला, “मिस्टर लिंकन, तुमचे वडील माझ्या कुटुंबासाठी वहाणा बनवायचे हे तुम्ही विसरू नका हं.” हे ऐकल्यावर सिनेटमध्ये सगळ्यांसमोर लिंकन यांचा अपमान झाला असं सगळ्यांना वाटत असतांनाच भाषणासाठी उभे असलेले अब्राहम लिंकन म्हणाले, “सर, माझे वडील वहाणा बनवायचे हे मला आठवते आहे. तुमच्याच नाही तर अमेरिकेतील बऱ्याच कुटुंबांसाठी त्यांनी वहाणा बनवल्यात कारण त्यांच्यासारख्या उत्तम वहाणा कुणालाही बनवता येत नसत. 

 

माझे वडील एक उत्कृष्ट निर्माते होते आणि याचा मला अभिमान आहे ! त्यांनी बनवून दिलेल्या वहाणांबद्दल तुमची काही तक्रार असेल तर मला सांगा कारण ती कला वारसा म्हणून माझ्याकडेही आली आहे. मी स्वतः तुम्हाला एखादा जोड बनवून देईल पण माझ्या माहितीत आत्तापर्यंत माझ्या वडिलांनी तयार केलेल्या वाहणांबद्दल एकही तक्रार आलेली नाही. अर्थात याचाही मला अभिमान आहे.” हे ऐकल्यावर खिल्ली उडवणाऱ्या माणसाला गुपचूप खाली बसण्यावाचून पर्याय राहिला नव्हता. अब्राहम लिंकनचे हे उत्तर म्हणजे लहानपणापासून त्याच्या आणि त्याच्या पालकांच्या नात्यांमध्ये असलेलं सामंजस्य आणि त्याचा लिंकनच्या बालमनावर झालेला सकारात्मक परिणाम आहे.

म्हणूनच नात्यांमधला पहिला सुर “सा आहे सामंजस्याचा !”

दुसरा सुर रे


रे आहे रेकग्निशन आणि रेडीनेसचा !


मुलांनी एखादी गोष्ट केली आणि ती खरंच उत्तम असेल तर त्याची अधिकृत मान्यता अर्थात रेकग्निशन हे मुलांना वेळोवेळी दिले पाहिजे. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर कित्येकदा मुलं आपला ‘उजवा हात’ असल्यासारखे वागतात. पाहुण्यापर्यंत पाण्याचे ग्लास, पोह्यांची डिश, त्यानंतरची बडिशोप हे सगळं आपण मुलांच्या माध्यमातून पोहोचवतो पण नंतर ‘त्यांची आपल्याला आज किती मदत झाली’ हे सांगायलाच विसरतो. “मी पण आईबाबांसाठी महत्त्वाचा आहे” ही भावना मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं रेकग्निशन मुलांपर्यंत पोहोचवायला हवं.
तसंच ज्यावेळेस मुलांना आपण हवे असतो, 

 

आपला वेळ हवा असतो, त्यावेळी आपणही त्यांच्यासाठी तयार असायला हवं, “रेडी” असायला हवं. मुलं उत्साहाने एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतात आणि आपण मात्र “थांब ना माझं एक काम होऊ दे”, “अरे, पोळी जळते माझी तुला समजत नाही का?”, “मी फोनवर बोलतोय,जरा थांब ना” अशा काही प्रतिक्रियांनी त्यांच व्यक्त होणंच थांबवतो. किमान मुलांचं बोलणं पूर्ण ऐकून घेण्याइतकातरी ‘रेडीनेस’ पालक म्हणून आपल्याकडे असायला हवा. एपीजे अब्दुल कलाम यांची एक सुंदर आठवण सांगितली जाते. रेडीनेस म्हणजे काय हे त्यातून तुम्हाला जास्त योग्य पद्धतीने लक्षात येईल.

 

एपीजे एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होते. तिथे त्यांच्या हाताखाली सत्तर एक शास्त्रज्ञ होते. एके दिवशी एक शास्त्रज्ञ त्यांना म्हणाला, “सर आपल्या शहरात भरलेले प्रदर्शन बघायला जायची माझ्या मुलांची खूप इच्छा आहे आणि आज त्यांना मी नेण्याचं वचनही दिलंय. तेव्हा कृपा करून आजच्या दिवस मला संध्याकाळी ५:३० वाजता जाण्याची अनुमती द्या.” एपीजे अब्दुल कलाम यांनी कुठलेही आढेवेढे न घेता त्यांना जाण्याची परवानगी दिली. परवानगी मिळाल्याच्या आनंदात तो शास्त्रज्ञ परत त्याच्या कामात गर्क झाला. त्याच्या हातातलं काम संपलं तेव्हा रात्रीचे ९ वाजत आले होते. काम संपल्यावर त्याला अचानक मुलांना दिलेल्या प्रॉमिसची आठवण झाली. घाईघाईने त्याने घर गाठलं. पाहतो तर मुलं घरातच नव्हती. बायको पुस्तक वाचत निवांत बसली होती. ‘ही वादळापूर्वीची शांतता आहे’ हे त्या शास्त्रज्ञाला जाणवलं. खूप हिम्मत करून त्याने विचारलं, “आपली मुले कुठे गेली?”


“प्रदर्शन बघायला गेलीयेत”
“कोणाबरोबर?”
“अहो, असं काय करताय तुम्हाला माहीत नसल्यासारखं? तुमचे कलाम सर आले होते आणि तुम्ही कामात व्यस्त आहात याची कल्पना देऊन ते मुलांना प्रदर्शन बघायला घेऊन गेले.”


बघा, पालक म्हणून त्या शास्त्रज्ञाचा रेडीनेस होताच मात्र देशाच्या कामात गर्क असणाऱ्या शास्त्रज्ञाला समजून घेण्याचा मोठेपणा एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे होता आणि अर्थातच कुणासाठीही, काहीही करण्याचा रेडीनेस ही तर एपीजे अब्दुल कलाम यांची एक खासियत होती. नात्यांमध्ये हा रेडीनेस, हे रेकग्निशन अत्यंत महत्त्वाचं असतं. “आपल्यासाठी कोणीतरी आहे आणि आपण जे करतोय त्याचं कुणाला तरी कौतुक आहे” ही भावनाच खूप सुखावणारी असते म्हणूनच नात्यांमधला दुसरा सुर “रे आहे रेकग्निशनचा, रेडीनेसचा !”

तिसरा सुर


“ग गमतीजमतीचा!”


पालक म्हणून आपण वयाने मोठे असतो आणि याचाच कित्येकदा आपल्याला फटका बसत असतो. अनेक वेळेला लहान मुलांसारखं बागडावं, मनसोक्त बडबड करावी, आपली आवडती गोष्ट तासन-तास करत बसावी, जे आपल्याला आवडत नाही ते कधीतरी स्पष्ट सांगावं असं आपल्याला वाटत असतं पण ‘वयाचा बागुलबुवा’ आडवा येत असतो. “मी तुझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून तू माझं ऐक” या वाक्याने तर नात्यांमधली गंमतच निघून जाते. आपल्या मुलांच्या कितीतरी लहानसहान गोष्टी आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवत असतात. त्यांच्या एखाद्या अंगविक्षेपावर आपण हसलो तर ती मुलं वारंवार तेच तेच करून आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतात. आपण मात्र पहिल्यांदा त्यांच्या कृतीला हसून दाद दिली होती हे विसरून त्यांच्यावरच डाफरतो. ते आपल्याला हसवण्याचा निरागस प्रयत्न करताय याकडे सोयीने दुर्लक्ष करतो. 

 

आपल्या हसण्यातुन मुलांनाही आनंद मिळतोय, त्यांना त्याची गंमत वाटतेय हे आपण समजूनच घेत नाही. आपल्या रोजच्या वागण्यातल्या कित्येक गोष्टी आपल्यालाही अनुभवातून समजलेल्या असतात. ‘काय गंमत झाली तुला सांगतो’ असं म्हणून आपण आपली लहानपणाची एखादी फजिती किंवा आपल्याला आलेले काही अनुभव हसत हसत, गोष्टीरूपात त्यांच्याशी शेअर केलेले मुलांना आवडतात. कधी तरी ते परत परत येऊन तुम्हाला “बाबा तुम्ही शेतात गेले होते त्यावेळेस काय झालं ते सांगा ना?” असं विचारून ती गंमत परत ऐकतात आणि त्याचा आनंद घेतात. गंमत ऐकून आपली मुलं ती विसरत नसतात तर आपल्या झालेल्या फजितीच काय कारण असेल? याचा ते विचार करत असतात आणि ‘तसा प्रसंग जर माझ्यावर आला तर मी काय करेल?’ हे सुद्धा ते मनाशी ठरवत असतात. माझ्या बोलण्याचा प्रत्यय बघायचा असेल तर लहानपणाची फजिती किंवा एखादा प्रसंग गमतीशीर पद्धतीने तुमच्या मुलांना सांगा आणि मग ‘तुझ्याबरोबर असं घडलं असतं तर तू काय केलं असतं?’ असा प्रश्नही विचारा. त्यांचे उत्तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल.


आत्ताच्या परिस्थितीत अनेक कुटुंबांनी घरातला किमान एक व्यक्ती गमावला आहे. मृत्यू ,कोरोना याची दहशत लहान मुलांच्या मनावरही आहेच. या परिस्थितीत समुपदेशन करण्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीय आहे. त्यातल्याच एका पालकांनी सांगितलेला किस्सा अतिशय बोलका आहे. कोरोना काळात त्या घराने दोन व्यक्ती गमावले. लहान मुलांना “त्यांना दवाखान्यात नेल, ते दुसऱ्या नातेवाईकांकडे गेलेत” असं काहीतरी सांगून त्यांनी मुलांची समजूत काढली पण  स्वतःला सावरु शकले नाही. अश्यावेळी थोडा एकांत मिळाला की आपल्या भावना डोळ्यावाटे बाहेर पडायला लागतात आणि अचानक आपल्या आई-बाबांना रडायला काय झालं? असा प्रश्न घरातल्या चिमुकल्यांना पडतो. तर या दोन व्यक्ती गमावल्यानंतर घरातली आई रडत असतांना तिचा छोटा मुलगा तिच्या मांडीत जाऊन बसला आणि ‘काय झालं’ असं वारंवार विचारू लागला. इतक्या लहान मुलाला कोणाचातरी मृत्यू झाला आहे असं कसं सांगायचं म्हणून आईने “काही नाही रे बाळा, तुझी आजी देवबाप्पाकडे गेली ना म्हणून रडते आहे.” असं त्याला समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. निरागसपणे ते लेकरु आधी आईला त्याच्या इवल्याशा मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागलं, मग आईचे डोळे पुसून म्हणालं, “अगं आई रडतेस कशाला? तू देव बाप्पाकडे गेलीस कि भेट ना मग आजीला! सो सिंपल” किती ते निरागस विचार आणि किती ती आलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्याची कोवळी खटपट!


मुलाच्या बोलण्याचं त्या मिनिटाला आई-वडिलांना खूप वैषम्य वाटलं. नंतर जरा परिस्थिती निवळल्यावर त्याच्या वागण्याचा त्यांनी परत एकदा विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि हे किती गमतीशीर आहे. आईची समजूत घालण्याची त्या मुलाची धडपड, त्यातून आईच्या समस्येवर आपण काहीतरी तोडगा काढतोय ही त्याची भावना किती सुंदर आहे. यातली गंमत जर आपल्याला ओळखता आली तर मुलांना दोष न देता त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचं आपल्याला कौतुकच वाटेल. नात्यांमधला गोडवा टिकून राहण्यासाठी तिसरा सुर “ग आहे गमतीजमतीचा !”

जीवनगाण्यातल्या सुरांचा अर्थ आपण बघत आहोत. पहिल्या तीन सुरांबद्दल मी माझे विचार मांडले. उर्वरित सुरांची नांदी पुढच्या लेखात करेल. आत्ता या लेखाची भैरवी इथेच करते….

क्रमशः

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)


आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.