मुंबई-मास्कचा वापर करणार नाही, असा पवित्रा घेतलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांवर लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहे.
सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती.
कालच राज ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे पुण्याचा दोन दिवसीय दौरा रद्द केला होता. त्यामुळे मनसेचा पुण्यातला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना ताप आल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलले. २४ ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर जाऊन भेट देणार होते तर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा ही राज ठाकरे घेणार होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.