नवी दिल्ली ,१० एप्रिल २०२५ – भारतातील आर्थिक राजधानी मुंबईवरील २००८ मध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारा तहव्वूर राणा कोणत्याही वेळी भारतावर पोहोचू शकतो.भारताचा शत्रू तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) घेऊन एनआयए पथक थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होत आहे. गेल्या १७ वर्षांपासून भारत राणा आणि त्याचा साथीदार डेव्हिड कोलमन हेडली यांना प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न करीत होता. याक्षणी हेडलीच्या बाबतीत भारताला फारसे यश मिळालेले नाही, परंतु अमेरिकेच्या खालच्या न्यायालयांपासून ते सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या दाव्यांना मान्यता दिली आणि त्याचे प्रत्यार्पण मंजूर केले.
काही वेळातच तहव्वूर राणाला घेऊन एनआयए पथक दिल्लीत दाखल होईल. राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्यात. दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं. तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात. तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे.
तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएची सात सदस्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. त्यात काही वरिष्ठ वकीलही आहेत. एडीजी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यर्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलीय. विशेष म्हणजे २६/११ च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रूग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं होते. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी त्यावेळी अनेकांचे प्राण वाचवले होते. राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत खटला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
कोण आहे तहव्वुर राणा?
१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वुर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि नंतर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेले. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागो येथे स्थायिक झाला, जिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता. राणाला २००८च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये १६० हून अधिक लोक मारले गेले होते. प्रेषित मुहम्मदचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या जिलँड्स-पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशीही त्याचा संबंध होता. राणावर १२ गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.