शासनाच्या प्रयत्नाने राज्य ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण जलसंपदा मंत्री जयंत पाटील
नाशिक– कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी उद्भवल्या होत्या. मात्र, आता शासनाच्या प्रयत्नाने संपूर्ण राज्य ऑक्सिजनच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होत आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वयंनिर्मित ऑक्सिजन तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी असलेल्या मध्यवर्ती यंत्रणेमुळे आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य यतींद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे यांच्यासह कळवण उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सुरवातीला जम्बो सिलिंडरची समस्या होती तर कधी कधी कंपन्यांना द्रवरूप ऑक्सिजन उपलब्धतेच्या तुटवड्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले होते. यावर उपाय म्हणून द्रवरूप ऑक्सिजन न वापरता हवेतील ऑक्सिजन वापरूनपी.एस.ए. तंत्रज्ञान ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य झाले आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयामार्फत २० हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याबद्दल अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आमदार नितीन पवार म्हणाले, कळवण आणि अभोना रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्याने तालुक्यात ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. तालुका आरोग्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर केले असून काही ठिकाणी जिल्हा नियोजनच्या निधीतून तर काही ठिकाणीसी.एस.आर.फंडातून त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आज कळवण येथे हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यापूर्वी जिल्ह्यात गिरणारे येथे पहिला तर त्यानंतर आजपर्यंत येवला आणि चांदवड उपजिल्हारुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले असून आदिवासी भागातील हा पहिलाच प्रकल्प आहे. आदिवासी भागातील दळणवळणाच्या गैरसोयी, ऑक्सिजन पुनर्भरण प्रकल्पामुळे साधारणतः १५० किलोमीटर अंतराचा फेरा या प्रकल्पावरमुळे वाचणार आहे. या प्रकल्पात दाखल रुग्णांना पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा तसेच जम्बो सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. यामुळे प्रकल्पामुळे उपजिल्हारुग्णालय व आवश्यकता भासल्यास शहरातील इतर रुग्णालयांची सोय होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांनी, ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाल्याने 110 जम्बो सिलिंडर्स प्रतिदिन निर्मिती होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे. तसेचपी.एस.ए. तंत्रावर आधारित ऑक्सिजन प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.