नाशिक : काही दिवसांपासून स्थिर असलेली कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या
एक हजाराच्या खाली आल्याने दिलासादायक परिस्थिती आहे. ही रुग्णसंख्या अजून कमी
होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्राधान्याने
पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबतआयोजीत आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन
पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल
आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद
नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क
फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस
उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर लक्षात घेता टेस्टिंगचे
प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात चार
ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प सुरू झाले असून आठ प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे. या
ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगच्या कामात ज्या जबाबदार यंत्रणेकडून दिरंगाई होत असेल
त्या संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. भुजबळ
यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेत करण्यात येणाऱ्या उपायोजनांच्या दृष्टिने बालरुग्णालये
तयार करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिस एकूण 758 रुग्णांमध्ये घट होवून सध्या 46
रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 632 रुग्ण बरे झाले असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणात आतापर्यंत 22 लाख 11 हजार 718 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले असून
याचेप्रमाण 30.14 टक्के आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याने पालकमंत्री श्री. भुजबळ
यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले की, कोरोना काळात कोरोना विषयक
उपाययोजनांसाठी आतापर्यंत 56 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात
आली आहे. तसेच जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पुर्व तयारी साठी साधारण एक हजार नवीन
बेड्स वाढविण्यात आले असून आजच्या स्थितीला 97 टक्के बेडस शिल्लक आहेत.
महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 100 किलोलिटरचे ऑक्सिजन टँक
बसविण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच अजून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा जिल्ह्यात
उपलब्ध आहे. आठ ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगचे सुरू असलेले काम लवकरात लवकर
पूर्ण करून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बैठकीत पालकमंत्री यांना
सांगितले.
बैठकीच्या सुरूवातील जिल्हा क्रीडा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘चला खेळ
खेळूया’ या पुस्तकाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.