“जस्ट थिंक” लघुपट ठरला कलातीर्थचा मानकरी
अन्य गटात "लॉस्ट इन", "पेपर बोट" अव्वल ; भारतासह पाच देशांतील लघुपटांचा सहभाग
नाशिक,दि.८ जानेवारी २०२३ – चित्रपट केवळ बघायचा नसतो तर तो अनुभवायचाही असतो, त्यासाठी संगीतासारख्या तांत्रिक बाबी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीत तंत्रज्ञ गंधार मोकाशी यांनी केले.निमित्त होते शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे. महोत्सवाचे हे सलग सहावे वर्ष होते. व्यासपीठावर बॉलीवूडचे सुप्रसिद्ध साऊंड इंजिनिअर गंधार मोकाशी, शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त अवधूत देशपांडे उपस्थित होते. एक मिनिट गटामध्ये लॉस्ट इन तर रिल्स मध्ये पेपर बोट यांनी बाजी मारली. लक्षवेधी लघुपट म्हणून “पासआऊट” लघुपटाला गौरविण्यात आले. विविध तेरा भाषांमधील तब्बल ७५ लघुपटांचा सहभाग महोत्सवात बघायला मिळाला.
सर्वोत्कृष्ट लघुपटांव्यतिरिक्त अन्य विभागांत ‘टेंडेंनी’ (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन), ‘तमाशबीन’ (सर्वोत्कृष्ट लेखन), ‘फेस’ (सर्वोत्कृष्ट संपादन), ‘डिंग डाँग’ (सर्वोत्कृष्ट संगीत) या लघुपटांना गौरविण्यात आले. रौप्यपदक, चषक, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानवता, सामाजिक भान, स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण, युवा वर्गाचे प्रश्न आदीसह विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या लघुपटांनी रसिकांना खिळवून ठेवले. महोत्सवात सहभागी सर्व लघुपटांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून पर्पल ग्रेप साऊंड संस्थेने काम पाहिले.
दरम्यान नाशिकच्या सुप्रसिद्ध निवेदिका स्वरदा कुलकर्णी यांनी मोकाशी यांची प्रकट मुलाखत घेतली. यात मोकाशी यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरदा कुलकर्णी, प्रिया सुरते, अमी छेडा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शौनक गायधनी, सुमंत वैद्य, पुष्कर पाडेकर, जयदीप पवार, सीमा पाठक, तेजस देव, शौनक जाखडी, साजी वेर्णेकर, महेश चौधरी, प्रसाद जोशी, अभिजीत अष्टेकर यांनी परिश्रम घेतले.
अटकेपार झेंडा
नाशिकमधील कलातीर्थ लघुपट महोत्सवाचा झेंडा अटकेपार पोहोचला आहे. भारतासह अन्य पाच देशांमधून या लघुपट महोत्सवात नोंदणी करण्यात आली असून नाशिककरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.