नाशिक – गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी जरी होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील वीकेंड लॉकडाऊन मध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या वीकेंड लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असून शासनाची परवानगी मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील वीकेंड लॉक डाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येईल. त्यामुळे अद्याप जिल्ह्यातील कोणतेच निर्बंध शिथिल केले नसल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील वीकेंड लॉक डाऊन मध्ये शनिवार किंवा रविवार या दिवशी एक दिवसाची शिथिलता द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मकता दर्शवली असून या बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार असून एकदिवस दुकाने सुरु करण्यास मान्यता द्यावी अशी विनंती आपण राज्यशासनाला केली आहे असे ही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
वीकेंड लॉक डाऊनचा निर्णय जरी अद्याप झाला नसला तरी शनिवार आणि रविवारी शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात यासंदर्भातआयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात पहिल्या लाटेत साधारण 137 मेट्रीक टन ऑक्सिजनचा सर्वाधिक वापर झाला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मागील वर्षातील सर्वाधिक ऑक्सिजन वापराच्या तुलनेत यावेळी 252 मेट्रीक टन ऑक्सिजन क्षमता तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पर्यटनाच्या माध्यमातून अर्थचक्र सुरू राहण्यासाठी चालना मिळेल, याकरीता नाशिक जिल्हा हा मुंबई व पुणे यांच्या लगतचा जिल्हा असल्याने चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात यावी. जेणेकरून, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांची कमी होणारी संख्या, कमी होणारा मृत्यूदर यासर्व परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू करण्यात आलेले उद्योग व्यवसाय यांच्या वेळेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढ करून ते शनिवारी देखील सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात यावी. तसेच त्यांना लसीच्या साठ्याबाबत माहिती मिळावी यासाठी फलक लावण्यात यावेत, असे निर्देश देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती बाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, मागील एक ते दिड महिन्यात जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर कमी होत असून तो सद्यस्थितीत 2.3 टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण 17 लाख 15 हजार 858 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकोसीसचे 67 रुग्ण उपचार घेत असून गेल्या आठवड्यात एकही रुग्ण बाधित झालेला नाही. त्याचप्रमाणे सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील 335 शाळा देखील सुरळीत सुरू आहेत, अशी माहिती यावेळी दिली.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कामांची व पुढील नियोजनाची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.