समाजमाध्यमे जपून वापरा….!

कोणत्याही पोस्टवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि पोस्ट फॉरवर्ड करायची असा  बेजबाबदारपणा टाळा !

0

समाजमाध्यमांतून प्रचार किंवा प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापर हे खरे म्हटले तर एक शस्त्रच झाले आहे. त्याचा अधिकाधिक वापर करून घेण्याची सुरुवात भारतीय जनता पार्टीने केली असली तरी आज हे शस्त्र त्यांच्यावरही वार करू लागले आहे. ते त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही दुधारी शस्त्र ठरत आहे. अगदी बूमरँगसारखे  मूळ ऑस्ट्रेलियन असलेल्या ‘बूमरँग’ या शस्त्राचे वैशिष्ट्य असे म्हणतात की, ते फेकणाऱ्यावरच उलटून येते. एक्स असो, फेसबुक असो किंवा व्हाट्सअप असो. त्यावर टीका करणाऱ्यांना काही वेळाने प्रत्युत्तर मिळालेले असते. त्यापैकी व्हाट्सअप हे तर  वापरण्यास अगदीच सोपे असल्याने अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहचले आहे. असंख्य लोक त्याचा योग्य तो वापर करत असतात. मात्र त्याचा वापर अपप्रचारासाठी अधिक होत असल्याचे दिसते. विशेषतः: राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठीराखे यांच्याकडून. त्यात पत्रकारही आले. समोर दिसलेली पोस्ट खरी आहे की नाही, त्यात कोणाची व्यक्तिगत बदनामी तर होत नाही ना, याची शहानिशा न करता ती फॉरवर्ड करण्याचा बेजबाबदारपणा इतका वाढला आहे की, त्यातून काट्याचा नायटा झाल्याचीही पुष्कळ उदाहरणे आहेत. त्यातीलच एक येथे सांगण्याचा मोह आवरला नाही म्हणून हा लॆखन प्रपंच.

अनेक व्हाट्सअप ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतरही सुमारे शंभरेक ग्रुपमध्ये मी आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांबरोबरच पत्रकार आणि विविध राजकीय कार्यकर्त्यांनी काढलेल्या ग्रुप्सचा त्यात समावेश आहे. त्यापैकी ताज्या बातम्या पुरवणाऱ्या एका चांगल्या, दर्जेदार चर्चा आणि खुसखुशीत टीका-टिपण्णी करणाऱ्या  ग्रुपध्ये रविवारी एका फोटो टाकला होता आणि त्याखाली काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले.

 

Use social media carefully...!

उमेदवाराचा फॉर्म भरायला राष्ट्रपती जाऊ शकतात का?
त्यांना राम मंदिराच्या उदघाटनाला येऊ दिले नाही.
संसद भवनाच्या उदघाटनाला येऊ दिले नाही.
त्या आज एका उमेदवाराचा अर्ज भरायला आल्या.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे.
देशाची गुलामगिरी कडे वाटचाल सुरु आहे का?
असे प्रश्न विचारताना वस्तुस्थितीचा विचार करायला हवा होता. मात्र त्या ऐवजी राजकीय चर्चेला ऊत आला.


अखेरीस या ग्रुपमधील इतर काही सदस्यांनी ‘मोदींनी अजून अर्जच भरलेला नाही’ असे सांगून ‘हा फोटो द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या त्यावेळच्या त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे. मोदी सूचक आणि राजनाथसिंह अनुमोदक होते’ असे स्पष्ट केल्यामुळे ‘देशाच्या गुलामगिरीच्या चर्चे’वर एकदाचा पडदा पडला. !

हे आजच झाले आहे का? किंवा पहिल्यांदाच झाले आहे का.तर नाही. पण या पासून धडा घेत व्हॅट्सऍपवर आलेल्या कोणत्याही पोस्टवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि पोस्ट फॉरवर्ड करायची अशा चुका आपणही टाळल्या पाहिजेत. जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणाऱ्या, भडकावणाऱ्या पोस्ट्स आपण पुढे पाठवण्याचे नेहमीच, पण या निवडणूक काळात तर आवर्जून टाळावे, असे माझे नम्र आवाहन आहे. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सलोखा टिकवण्यासाठी आपण एवढे तरी नक्कीच करू शकतो. राजकारण हा धंदा झाला आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी सहिष्णुता सोडून दिली असली तरी आपण तेवढी सहिष्णुता पाळण्यास हरकत नाही.
-सुधीर कावळे 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
Mo-9423157510

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.