दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या अध्यक्षपदी विश्वास ठाकूर  

उपाध्यक्षपदी वसंतराव घुईखेडकर यांची निवड

0

नाशिक,दि,२ डिसेंबर २०२३ – दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या पंचवार्षिक निवडणूक २०२२-२०२७ साठी विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनल’ने २१ पैकी १८ जागा जिंकून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूक दणदणीत विजय मिळवला आहे.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या कार्यालयात आज झालेल्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘अध्यक्ष’पदी विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची तर ‘उपाध्यक्ष’पदी दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चे वसंतराव घुईखेडकर (यवतमाळ) यांची एकमताने निवड झाली.विश्वास ठाकूर यांची ‘अध्यक्ष’पदी असोसिएशनवर दुसर्‍यांदा निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यापूर्वी विश्वास ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील विविध समित्यांवर यशस्वीपणे काम केले असून सहकारातील आधुनिक बदलांसाठी, सुधारणांसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.  सहकारातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडविण्यासाठी ते कार्यरत आहेत. भारतातील मोजक्याच सहकार नेतृत्वात त्यांचा नामोल्लेख केला जातो. माजी संचालक-नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप.बँक्स अ‍ॅन्ड क्रेडीट सोसायटीज् लि. (नॅफकब, दिल्ली),  अध्यक्ष-नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असो.मर्या. नाशिक, माजी विशेष निमंत्रित-दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई, युनो (दि युनायटेड नेशन्स जनरल अ‍ॅसेंब्ली)ने २०१२ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागाने एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीत संपूर्ण देशातून एकमेव अशासकीय सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या बँकिंग रेग्युलेशन कायदा सुधारणा समितीवरही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणार्‍या सुखठणकर समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नागरी सहकारी बँकांच्या विविध कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी स्टडी ग्रुप या समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विचारमंच सभेत सदस्य म्हणून कार्य., यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), महाराष्ट्र शासन, पुणे येथे मा. महासंचालक यांनी सहकार विचार मंचच्या सभेवर त्यांची सदस्य’ म्हणून नियुक्ती केली होती. स्वयंसहाय्यता गटांचे स्वसंवर्धन व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सहकारी बँकांकडून अर्थसहाय्य व बँकिंग सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी  मा. सहकार आयुक्त यांनी कोअर ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपमध्ये विश्वास ठाकूर यांनी सदस्य’ म्हणून कार्य. समाजातील दारिद्रय रेषेखालील व ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी स्वयंरोजगार सहाय्यता गट’ ही योजना विश्वास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक महानगरपालिकेच्या मदतीने तातडीने कार्यान्वित केली होती. याबाबत मा. महानगरपालिका आयुक्तांनी गौरव केला आहे.

शनिवार दि. २२ व रविवार दि.२३ जानेवारी २०११ रोजी नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद संपन्न झाली. मा. विश्वास ठाकूर हे परिषदेचे निमंत्रक होते. यात महाराष्ट्रातून सुमारे 2500 हून अधिक नागरी सहकारी बँकांचे चेअरमन, संचालक यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

विश्वास ठाकूर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची पावती म्हणजे गेल्या २६ वर्षात त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यात विश्वास बँकेला १३ राष्ट्रीय, २१ राज्यस्तरीय, ९ जिल्हास्तरीय असे एकूण ४३ पुरस्कार व विश्वास ठाकूर यांना ३ राष्ट्रीय, २० राज्यस्तरीय, २४ जिल्हास्तरीय असे एकूण ४७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई ही संस्था महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका या सहकार क्षेत्रातील बँकांच्या कामकाजात समन्वय साधणारी संस्था आहे. सहकार खाते, अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि सहकारी बँका यामधील दुवा साधण्याचे काम असोसिएशन करत आहे. सहकार क्षेत्रातील भविष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान या चतुःसुत्रीचा सातत्याने अवलंब असोसिएशन करत असते.

यावेळी सुभाष जोशी, गुलाबराव देवकर, प्रा. संजय भेंडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, मुकुंदकुमार कळमकर, रविंद्र दुरुगकर, जगन्नाथ बिंगेवार, राजेंद्र महल्ले, प्रंचित पोरेड्डीवार, कैलास जैन, श्रीमती रुपा देसाई-जगताप, योगिनी पोकळे, भाऊ कड, राजेेंद्र सुर्यवंशी, अर्जुनराव गाढे आदी नवनिर्वाचित संचालक व विनायक तराळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्वाती पांडे उपस्थित होते.

विश्वास ठाकूर यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.