माणसं जोडणे ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’चा मूलमंत्र – दिलीप पांढरपट्टे

0

औरंगाबाद : ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले! या कवी सुरेश भटांच्या ओळीप्रमाणे लेखक विश्वास ठाकूर यांनी नात्यांच्या सर्व्हिसिंगकडे पाहिले. विश्वासघात, अपेक्षा भंग होऊनही नाते ‍टिकवण्याचा, माणसे जोडण्याचा मूलमंत्र ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ ग्रंथात त्यांनी दिल्याचे माहिती व जनसंपर्क, महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले. उत्कंठावर्धक, आटोपशीर, दर्जेदार साहित्यकृती ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ उपलब्ध झाल्याचे सांगत ठाकुरांच्या साहित्यनिर्मिती प्रवासाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात विश्वास ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, नाट्य  व सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कवी दासू वैद्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे दत्ता बाळसराफ, साहित्यिक शंकर बोराडे, अपर्णा कक्कड, लेखक विश्वास ठाकूर उपस्थित होते.

श्री.पांढरपट्टे म्हणाले,

चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला,

उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला

ते राजमार्ग सगळे लखलाभ हो तुम्हाला,

गेलो जिथे जिथे मी रस्ता तयार झाला.

अशाचप्रकारे ठाकुरांनी बँकेतील आर्थिक व्यवहार असूनही माणसांशी नाते तुटू दिले नाही. नात्यांत कडवटपणा येऊ दिला नाही. अनेक समस्यांवर मार्ग शोधत माणसे जोडली. माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत असल्याचे संग्रहातून समजते. माणसे तोडायची नाहीत, किंबहुना ती तुटू द्यायची नाहीत. ती उभी करायची, हा त्यांचा जीवनमंत्रही ग्रंथातून लक्षात येतो. ग्रंथातील एका कथेत ठाकूर लिहितात ‘परिस्थितीने पिचलेली माणसे माझ्यासमोर आली, की का कोण जाणे ? मन व्याकूळ होते. तो संपूर्ण दिवसच मग माझा कोलमडून जातो, आणि ते गांजलेपण न कळतपणे माझ्या मनावर येऊन बसते.’  यातून त्यांची सामान्य माणसांशी असलेले नाते, ते घट्ट विणण्यासाठी त्यांची तळमळ दिसून येते.

बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर । पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर ।

या संत कबिरांच्या दोह्याप्रमाणे आजची परिस्थिती अनुभवयास मिळते आहे.  याचा अर्थ, खजूरचे झाड मोठे, खजूरही उंचावर आहेत, परंतु सावली मात्र नाही. अशाचप्रकारे आपण कोणाचे कल्याण करू शकलो नाही, तर काय फायदा ? त्याचप्रकारे ठाकूर लोककल्याणाबरोबरच नात्याची घट्ट वीण बांधतांना ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’मधून स्वानुभवावरून रचलेल्या कथा उलगडत जातात. ज्या साध्या, सरळ, आटोपशीर आणि दर्जेदार आहेत.  मधु मंगेश कर्णिक, वसंत अबाजी डहाके यांनीही त्यांच्या या साहित्यकृतीचे भरभरून कौतुक केले आहे, असेही पांढरपट्टे म्हणाले.

नेमके, मोजके लेखन ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ आहे. लेखकांनी लेखन प्रवास सुरूच ठेवावा, असे आवाहन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. कदम यांनीही ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ भावले असल्याचे सांगत एमजीएम उभारणीत  नाते जपताना, सर्व्हिसिंग करतानाच्या घटनांवर प्रकाश टाकला.

डॉ.निखील गुप्ता यांनी चार्ल्स प्लम्ब  यांची कथा सांगत नात्यातील संबंध शारीरिक, मानसिक, नैतिक आणि भावनिकरित्या सकारात्मकपणे वृद्धींगत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पोलिस सेवेत कार्य करताना प्रकर्षाने जाणवते, की नात्यातील सर्व्हिसिंग सातत्याने करणे आवश्यक आहे. सध्या समाजात निर्माण होत असलेला दुरावा कमी करण्याचे काम ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ यामधून होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विश्वास ठाकूर यांनी पुस्तक निर्मितीबद्दल सांगितले.बँकेतील अनुभव आणि ग्राहक यावर आधारित असलेल्या पुस्तकात 25 कथा सत्य घटना आहेत. शेवटची कथा दुखावले गेलेल्या वडिलांबाबत आहे. ते दुखावले न जाण्यासाठी पर्याय उपलब्ध असतानाही नात्याची सर्व्हिसिंग करता आली नसल्याची खंत असल्याचेही ठाकूर म्हणाले. प्रकाशनानंतर ठाकूर, ‘टिश्यू पेपर’चे लेखक रमेश रावळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

दत्ता बाळसराफ यांनी समाजात छोटछोट्या बाबीवर वाद होतात. ते टाळता येणे शक्य आहे, मात्र अहंकारामुळे तो चिघळतो. साक्षीभाव, सजगतेने जीवन जगता येते, पूर्वीसारखे एकत्र कुटुंब पद्धतीतील नात्यातील आपुलकी जपता येते, ते करणे आवश्यक आहे. ठाकूर यांच्या साहित्यकृतीतून ते कळते. नाते तपासणे, ते दुरुस्त करण्याची जाणीव या ग्रंथातून होते, असे मत मांडले.

दासू वैद्य यांनी भोवतालातून निर्मित झालेल्या या गोष्टरूपी साहित्याचा दर्जा उत्तम असल्याचे सांगितले. असा भाबडेपणा नको, या कथेचा संदर्भ देत  ग्रामीण, कृषी संस्कृतीची जाणीव सकारात्मकपणे डोळ्यासमोर येते. माणसावर माणूस म्हणून लेखक प्रेम करतात, त्यातून ही साहित्यनिर्मिती तयार होते, असेही ते म्हणाले.  कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, मसापचे सदस्य संजय करंजकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे आदींसह साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम पोतदार यांच्या अभंग गायनाने झाली. प्रास्ताविक नीलेश राऊत,  सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले. लेखकांचा परिचय डॉ. रेखा शेळके यांनी करून दिला. आभार सुहास तेंडूलकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता गौरी कुळे हिच्या आवाजातील पसायदानाने झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुबोध जाधव, शिव कदम, महेश देशमुख, मंगेश निरंतर, प्रवीण देशमुख, मयूर देशपांडे, दीपक जाधव, उदय भोसले, रोहन देशपांडे, अजय भवलकर, श्रीकांत देशपांडे, गणेश घुले, सचिन दाभाडे आदींनी परिश्रम घेतले.

फेसबूकवर कार्यक्रम उपलब्ध

कोविड नियमांचे पालन करत केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम फेसबूकवर @vishwasthakurofficial आणि नीलेश राऊत यांच्या @raut.nc या खात्यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आ

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.