नाशिक : नाशिक जिल्ह्यात ३० डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.नाशिकमधून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला १५५ नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील ३० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. ज्या तालुक्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत त्याभागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येऊन रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.
नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने आता आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. या व्हेरिएंट बाधित रुग्णांनी कुठे कुठे प्रवास केला ? त्यांच लसीकरण झाले होते का ? कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का ?, या बाबतची सखोल माहिती घेतली जात आहे. नाशिकमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आल्यानंतर हे रुग्ण कुणाच्या संपर्कात आले होते का, ज्यांच्या संपर्कात आले त्यांची प्रकृती कशी आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरु असून रूग्ण आढळून आलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे. यातील काही रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. या सर्व बाबी आता तपासल्या जात आहेत.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.
देशात आतापर्यंत डेल्टा प्लसचे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. नाशिकमध्ये मात्र डेल्टाचा शिरकाव झाला नव्हता. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सर्वाधिक ९ रुग्ण आढळून आले आहेत. जळगावमध्ये ७, तर मुंबईत २ रुग्ण आढळून आले आहेत.डेल्टा आणि डेल्टा प्लस हे दोन व्हेरिएंट आहेत मात्र नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला आला आहे.