जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
#ZakirHusai जगभरातील संगीतप्रेमी आणि कलाकारांवर शोककळा
नवी दिल्ली,दि,१५ डिसेंबर २०२४ – जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे चाहते आणि संगीत जगतात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली आणि वाहिली जात आहे. या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानाबद्दल जगभरातील संगीतप्रेमी आणि कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.
त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या जगात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जात होते. १९५१ मध्ये तबला वादक उस्ताद अल्ला रखा यांच्या पोटी जन्मलेल्या झाकीर हुसैन यांनी लहानपणापासूनच आपले संगीत कौशल्य दाखवायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ७व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर सादरीकरण करून तबल्याला नवी ओळख दिली.यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. १९७३ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.
झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. 1970 मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, “शक्ती” नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली.झाकीर हुसेन यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादर सुरु होते.