दशक आठ समास दहा
जय जय रघुवीर समर्थ. आपण स्वतःच वस्तू व्हायचं अशा तऱ्हेने वस्तूला पाहायचं. हे पाहिले असता शून्यत्व वेगळ आहे हे लक्षात येतं. त्यामुळे शून्य म्हणजे काही परब्रम्ह होणार नाही. ब्रह्मस्वरूप होऊनच अनुभव घेतला पाहिजे. आपण ही वस्तू सिद्धच आहे मन म्हणजे मी अशी कल्पना करू नये. मी मन नाही, साधू सांगतात तूच आत्मा आहेस. मग मन म्हणजे मी असं का म्हणायचं? संतवचनावरती विश्वास ठेवला तर शुद्ध स्वानुभव येतो. जसा मनाचा स्वभाव असतो तसं आपण वस्तूकडे पाहतो.
ज्याचा अनुभव घ्यावा तोच निरवयव अनुभव आपल्याला मिळतो. आपला अनुभव विश्वाचा अनुभव होऊन जातो. लोभी लोक धन मिळवण्यासाठी गेले तेव्हा ते धनच होऊन गेले. मग जे भाग्यवान होते त्यांनी त्या धनाचा लाभ घेतला. त्याप्रमाणे देहाबुद्धी सोडली तर साधक स्वतःच ब्रह्मरूप होतो हे अनुभवाचे मुख्य लक्षण आहे. आपण म्हणजे परब्रम्ह, हाच ज्ञानाचा विवेक होय. येथे ज्ञानाचा हा दशक संपूर्ण झाला आहे. आत्मज्ञानाची माहिती अशा तऱ्हेने मी यथामती दिलेली आहे. त्याच्यातील त्रुटीबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. असं समर्थ सांगत आहेत. इतीश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शून्यत्व निरसन नाम समास दशम समाप्त.
गुणरूप नाम दशक नवम समास
एक आशंका नाम समास जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. श्रोते विचारत आहेत, निराकार म्हणजे काय? निराधार म्हणजे काय? निर्विकल्प म्हणजे काय? हे मला सांगावे. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्वीकल्प म्हणजे कल्पना नाही, त्याला परब्रम्ह म्हणतात. निरामय म्हणजे काय? निराभास म्हणजे काय? निरादेव म्हणजे काय? मला सांगावे. निरामय म्हणजे जलमय नाही, निराभास म्हणजे न भासणारे, निरवयव म्हणजे अवयव नसलेले. निःप्रपंच म्हणजे काय? निष्कलंक म्हणजे काय? निरुपाधिक म्हणजे काय? मला सांगावे. निःप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कलंक म्हणजे कलंक नाही,
निरूपाधी म्हणजे उपाधी नाही. निरुपम्य म्हणजे काय? निरालंब म्हणजे काय? निरपेक्षा म्हणजे काय? मला सांगावे निरुपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे कशावरही आधारलेले नाही, निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा नसलेले. निरंजन म्हणजे काय? निरंतर म्हणजे काय? निर्गुण म्हणजे काय? मला सांगावे. निरंजन म्हणजे जन सृष्टी नाही असे, निरंतर म्हणजे अंतर नाही असे, निर्गुण म्हणजे परब्रह्माला कोणतेही गुण नाहीत. नि:संग म्हणजे काय? निर्मळ म्हणजे काय? निश्चळ म्हणजे काय? मला सांगावे. निसंग म्हणजे संग नाही, निर्मळ म्हणजे मळ नाही, निश्चळ म्हणजे चलनवलन नाही.
निशब्द म्हणजे काय? निर्दोष म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय? मला सांगावे. निशब्द म्हणजे शब्दच नाही, निर्दोष म्हणजे दोषच नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही. निष्काम म्हणजे काय? निर्लेप म्हणजे काय? निर्दोष म्हणजे काय? मला सांगावे. निष्काम म्हणजे कामच नाही, निर्लेप म्हणजे लेपच नाही, निष्काम म्हणजे कामच नाही. अनाम्य म्हणजे काय? अजन्मा म्हणजे काय? अप्रत्यक्ष म्हणजे काय? मला सांगावे. परब्रम्ह अनाम्य आहे म्हणजे त्याला नाव नाही, अजन्मा आहे म्हणजे त्याला जन्म नाही, ते अप्रत्यक्ष आहे,म्हणजे प्रत्यक्ष नाही. अगणित म्हणजे काय? अकर्तव्य म्हणजे काय? अक्षय म्हणजे काय? मला सांगावे. परब्रम्ह अगणित आहे, म्हणजे त्याला मोजमाप किंवा मर्यादा नाही. अकर्तव्य आहे म्हणजे त्याला कर्तव्य नाही. अक्षय आहे म्हणजे त्याचा क्षय होत नाही. अरूप म्हणजे काय? अलक्ष म्हणजे काय? अनंत म्हणजे काय? मला सांगावे. परब्रम्ह अनंत आहे म्हणजे त्याला अंत नाही.
अरूप आहे म्हणजे त्याला रूप नाही. अलक्ष म्हणजे त्याला वेगळे राहून पाहता येत नाही. अपार म्हणजे काय? अढळ म्हणजे काय? अतर्क्य म्हणजे काय? मला सांगावे. अपार म्हणजे परब्रम्हाला पार नाही, दुसरा किनारा नाही. अढळ म्हणजे ते एका ठिकाणी स्थिर असते, अतर्क्य म्हणजे त्याचा तर्क करता येत नाही. अद्वैत म्हणजे काय? अदृश्य म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय? मला सांगावे. अद्वैत म्हणजे द्वैतच नाही, अदृश्य म्हणजे दृश्यच नाही, अच्युत म्हणजे ते डळमळीत होत नाही त्याला परब्रह्म म्हणतात. अच्छेद म्हणजे काय? अदाह्य म्हणजे काय? अक्लेश म्हणजे काय? अक्लेद म्हणजे काय? मला सांगावे. अच्छेद म्हणजे ते कापता येत नाही. अदाह्य म्हणजे ते जाळता येत नाही. अक्लेद म्हणजे ते कशात मिसळता येत नाही. कालवता येत नाही. असे परब्रम्ह म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळे त्याला पाहिल्यावर आपणच ते होऊन जातो. हे अनुभव घेतल्यावर कळतं आणि हा अनुभव सद्गुरु केल्यावर होतो. असं प्रतिपादन समर्थ करीत आहेत. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आशंका नाम समास प्रथम समाप्त.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७