छगन भुजबळांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल !

0

बीड –राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली होती.त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी बीडमध्ये उत्तरसभा घेतली.छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आणि जोरदार हल्लाबोल केला आहे.

या वेळी छगन भुजबळ म्हणाले आमच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली.हा छगन भुजबळ अडीच वर्ष आतमध्ये होता. तुम्ही म्हणता घाबरला म्हणून महा युतीत गेला. हा छगन भुजबळ तुमच्यासोबत १९९१ पासून आहे. तुम्हाला जेव्हा काँग्रेसमधून बाहेर काढलं,तेव्हा हा छगन भुजबळ तुमच्यासोबत होता.काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. राजकारणात पुढे जायचं असतं,पण हा  छगन भुजबळ तुमच्या बरोबर राहिला असं ही भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले.

साहेब आमचं काय चुकलं सांगा. तुम्ही आमच्यावर हल्ले का करता आहात? हल्ले कुठल्या प्रकारचे करता? इथे येयचं आणि अमरसिंह पंडीत यांच्यावर काहीतरी बोलायचं… दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय. तुम्ही धनंजय मुंडेंचा इतिहास काढलात. तुम्हीच सांगितलं होतं. खासगी गोष्टींवर बोलायचं नाही. आता तुम्ही कुठून कुठं आलात. बोलायला गेलं तर खूप आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवारच आहेत.जनतेचा महासागर सांगतोय राष्ट्रवादी अजित दादांसोबतच आहोत,असं छगन भुजबळ बीडमधील जाहीर सभेत म्हणाले आहेत.

अजितदादा तुमचे नेते आहेत तर त्यांना पाठिंबा देऊन टाका.पवारसाहेब तुम्ही काय बोलता? हे आम्हाला समजतच नाही. गुगलीमध्ये स्वत:चा गडी बाद करतात का? असा खडा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. त्यावेळी तेलगी स्कॅमवरून देखील छगन भुजबळ यांनी प्रश्नांच्या फेऱ्यात अडकवलं होतं आणि मला राजीनामा राजीनामा देखील द्यायला लावला यावेळी पवार साहेब त्यावेळी तुमच्यावर पण आरोप झाले होते मग तुम्ही का राजीनामा दिला नाही असा सवाल ही भुजबळांनी केला .

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सत्तेत सहभागी झालो आहे. ओबीसी दलीत, आदिवासी बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्ग कदापी सोडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भव्य सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविले जातील. मागच्या सरकारमध्ये ५० हजार कोटी किंवा १ लाख कोटी रुपये खर्च होउद्या परंतु पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा अशी मागणी आपण केली.मात्र त्यावर निर्णय झाला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वळण योजनांचा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे.आता अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण करून हा संपूर्ण मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील, मंत्री संजय बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आसबे,अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित,योगेश क्षीरसागर, सुभाष राऊत,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.