नवी दिल्ली राष्ट्रीय पथसंचलनात नृत्यांगणच्या विद्यार्थिनी कथक नृत्य सादर करणार
नाशिककरांसाठी अभिमानाची बाब
नाशिक,दि,२४ जानेवारी २०२४ – प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित केल्या जाणाऱ्या अत्यंत मानाच्या अश्या राष्ट्रीय पथसंचलनात नाशिक मधील आठ कथक नृत्यांगना सादरीकरण करणार आहेत. येत्या २६ जानेवारीला म्हणजेच भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ” कर्तव्यपथ “, (राज पथ) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पथसंचलनात नाशिक नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या नर्तिका आपल्या कथक नृत्याचे सादरीकरण करतील. यंदा “नारी शक्ती” आणि “विकसित भारत” अशी ह्या नृत्य सादरीकरणाची संकल्पना असणार आहे. ह्या सादरीकरणासाठी भारत सरकारच्या “संगीत नाटक अकादमी” च्या प्रमुख ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा ह्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्यासाठी मोठ्या मेहनतीने दिल्ली येथे ह्या नृत्यांगना सराव करीत आहेत.
आठही विद्यार्थिनी ह्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरू कीर्ती भवाळकर यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. गुरू कीर्ती भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नृत्यांगना गेली १२-१५ वर्षे कथक नृत्याची तालीम घेत आहेत. प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या पथसंचलनात हा समूह “कथक” ह्या शास्त्रीय नृत्याचे तसेच नाशिक नगरीचे आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या “वंदे भारतम्” ह्या स्पर्धेतील निवड प्रक्रिया पार करून समूहातील नृत्य कलाकारांची निवड झाली आहे.
गुरू कीर्ती भवाळकर ह्यांच्या नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतील तन्वी कुलकर्णी,जान्हवी कुलकर्णी,श्रावणी पुराणिक,साक्षी पुजारी,रिया भावसार,वसुंधरा आहेर,तेजल मांडवकर आणि अनुष्का गोखले ह्या आठ विद्यार्थिनी पथसंचलनात नृत्य सादरीकरण करणार आहेत.
नवी दिल्ली येथील “कर्तव्य पथ” (राज पथ) येथे माननीय राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या समोर ह्या कथक नृत्यांगना नृत्य सादरीकरण करतील. ह्या वर्षी च्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्स चे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन ह्यांना प्रमुख अतिथी म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. अश्या सर्व दिग्गजांसमोर नृत्य सादरीकरण करण्याचा मान नाशिकच्या नृत्यांगनांना मिळाला आहे ही नृत्यांगण कथक नृत्य संस्थेसाठी तसेच नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.