आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त AYNI चे व्यापक अभियान
४५०० हून अधिक नाशिककरांपर्यंत पोहोचला योगाचा संदेश :शाळा,महाविद्यालये,सामाजिक संस्था आणि ऑनलाइन माध्यमांतून योग जनजागृती

नाशिक, दि,२३ जून २०२६- Nashik Yoga Events आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य योग अँड निसर्गोपचार संस्था (AYNI) यांनी २८ मे ते २१ जून २०२६ या कालावधीत नाशिक शहर व परिसरात व्यापक योग जनजागृती अभियान राबविले. 8 दिवसाचे ऑनलाईन youtube live protocol training आणि ऑफलाइन माध्यमांतून आयोजित विविध उपक्रमांद्वारे ४५०० हून अधिक नागरिकांपर्यंत योगाचे महत्त्व पोहोचविण्यात आले.
या अभियानाचे समन्वयन सौ. स्नेहल कुलकर्णी-पाटील यांनी केले. नाशिक विभागाच्या समन्वयक सौ. जयश्री भामरे यांच्या नेतृत्वाखाली सौ. प्रिया जोशी, नेहा शेंडे, सौ. सोनाली वाजे, सौ. सोनाली ब्राम्हणकर आणि सौ. नेत्रा गज्जर यांनी विविध ठिकाणी योग सत्रांचे यशस्वी आयोजन केले.
सामाजिक उत्तरदायित्व जपत संस्थेने २०० हून अधिक नागरिकांना सुमारे ३५०० रुपये मूल्याचा योग अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून दिला. ‘विद्यादान’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक डॉ. विजय कुकरेजा यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन, बुद्धी आणि चेतना यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. योगाच्या माध्यमातून मानसिक स्थैर्य, सकारात्मक विचारसरणी, भावनिक संतुलन आणि व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो.
या अभियानांतर्गत रासबिहारी इंग्लिश मीडियम स्कूल, नवरचना मराठी व इंग्लिश मीडियम शाळा, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय, महानगरपालिका शाळा तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय AYNI च्या यूट्यूब लाईव्हद्वारे चार दिवसांचे ऑनलाइन योग प्रशिक्षण सत्रही घेण्यात आले, ज्याचा लाभ १५०० हून अधिक नागरिकांनी घेतला.
(Nashik Yoga Events) गोविंद नगर, सातपूर आणि नाशिक रोड परिसरात आयोजित विशेष योग शिबिरांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ‘निरोगी वार्धक्यासाठी योग’ या संकल्पनेला यंदा विशेष प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
योगशिक्षण अधिक सुलभ आणि व्यापक करण्यासाठी संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत LMS (Learning Management System) या डिजिटल व्यासपीठाची माहितीही नागरिकांना दिली. पारंपरिक योगविद्या आणि आधुनिक शिक्षणपद्धती यांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण अभियानात योग शिक्षक, स्वयंसेवक, समन्वयक आणि आरोग्य प्रशिक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निरोगी, सजग आणि सशक्त समाजनिर्मितीसाठी योगाला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न भविष्यातही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



