बाबाज थिएटर्स तर्फे १ मे ला “गर्जतो मराठी” या कार्यक्रमाचे आयोजन
कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन सुलेखनकार निलेश गायधनी,पूजा गायधनी,अभिनेत्री पूनम पाटील,सतार वादक प्रतिक पंडित यांचा होणार सन्मान
नाशिक,दि २९ एप्रिल २०२५ – बाबाज थिएटर्स च्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.बाबाज थिएटर्स तर्फे आयोजित दर महिन्याच्या १ तारखेला ज्येष्ठ नागरिक आणि सुजाण संगीत प्रेमी यांना विरंगुळा यां हेतूने संगीत मैफल व कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा आयोजन सातत्याने कुर्तकोटी सभागृह शंकराचार्य न्यास येथे करण्यात येते.१ मे रोजी होणाऱ्या या मासिक उपक्रमाचे हे ५४ व पुष्प गुंफणार आहे.
प्रशांत जुन्नरे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात सरगम म्युझिक अकॅडमी संचलित नंदकुमार देशपांडे प्रस्तुत “गर्जतो मराठी”हा महाराष्ट्र दिना निमित्ताने मराठी अविस्मरणीय गाण्यांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.निवेदन संजय किल्लेदार हे करणार असून सुप्रसिद्ध गायक नंदकुमार देशपांडे, संतोष कराळे, अमित गुरव, अजय पाटील, मयुरी मुर्डेश्वर, सानिका जैन, आणि दर्शना बडोगे हे गायक मराठीतील अजरामर गीते सादर करतील.
याच कार्यक्रमा अंतर्गत सुरवातीला नाशिकच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन मान्यवरांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सर चिटणीस आदरणीय नितीनजी ठाकरे आणि महाराष्ट्र भंडारचे संचालक मंगेश पिसोळकर हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
या कार्यक्रमात कृतज्ञता सन्मान पुरस्कार सुलेखन क्षेत्रात विशेष योगदान देणारे सुलेखनकार निलेशगायधनी, पूजा गायधनी यांना देण्यात येणार असून सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अभिनेत्री पूनम पाटील,प्रतिक पंडित( सितार वादक)यांना सन्मानित करण्यात येणार आहेत.
तरी या विशेष कार्यक्रमाला कुर्तकोटी सभागृह शंकराचार्य न्यास येथे सायंकाळी ६:१५ वाजता रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्र दिन साजरा करावा असे आवाहन बाबाज चे कैलास पाटील, योगिता पाटील, शामराव केदार, दिलीपसिंह पाटील, जे. पी. जाधव, प्रा. प्रीतीश कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, मिलिंद जोशी यांनी केले आहे.