नाशिकच्या राजकारणात भूकंप :सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप भाजपात प्रवेश
🔴 भाजपने घेतली मोठी राजकीय आघाडी,नाशिक महानगरपालिकेत १०० च्या वर नगरसेवकांचं लक्ष्य
मुंबई, १७ जून २०२५ : Nashik Politics Update नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर नयना घोलप,अशोक मुर्तडक,देवानंद बिरारी, वंदना बिरारी, अशोक सातभाई दिलीप दातीर,दीपक बलकवडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सुधाकर बडगुजर यांची भाजपात एन्ट्री ही अनेक चर्चांनंतर आणि विरोधांवर मात करत झाली. शिवसेना (ठाकरे गट) कडून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी या प्रवेशाला जाहीर विरोध केला होता. तरीही गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीमुळे अखेर बडगुजर भाजपात दाखल झाले.
कार्यक्रम दरम्यान बडगुजर म्हणाले, “मी निष्पाप आहे, कोव्हिड काळात मी सेवा केली. गिरीश भाऊ संकटमोचक आहेत. मी भाजपात निष्ठेने काम करणार आहे.”
त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, “बडगुजर यांचा प्रवेश कोअर टीमच्या सल्ल्यानंतर झाला आहे. कोणतेही मनभेद नाहीत, काही मतभेद होते तेही दूर होतील. भाजपात कुणाचीही प्रतिष्ठा कमी होणार नाही.”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित राज्याचा संकल्प झालाय. आम्ही सर्व कोअर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल. अधिक ताकदीनं आम्हाला पुढे जाता येईल. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संकल्पाला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश होत असतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला. सकाळी निघालो तेव्हा वाटलं २-३ दिवसांनी पक्षप्रवेश ठरेल. मात्र, आजच मंगळवार असल्याने त्यांनी आज ठरवलं.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मागील वेळी ६८ नगरसेवक होते, आता १००चा आकडा पार करायचा आहे.”
राजकीय विश्लेषण:(Nashik Politics Update)
या प्रवेशामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे भाजप महायुतीतून पालिकांवर वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे इतर पक्षांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.