नाशिकहून दिल्लीसाठी आता दिवसातून दोन वेळा विमानसेवा….

2

नाशिक, दि. ५ ऑक्टोबर २०२५ Nashik Delhi flights नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! काही महिन्यांपूर्वी मर्यादित करण्यात आलेली नाशिकदिल्ली विमानसेवा आता पुन्हा पूर्ववत होत असून, २६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्सकडून दिवसातून दोन वेळा ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे नाशिक आणि दिल्लीदरम्यान प्रवास करणाऱ्या व्यावसायिक, पर्यटक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धावपट्टीचे काम पूर्ण; सेवा पुन्हा नियमित (Nashik Delhi flights)

नवी दिल्ली विमानतळावरील Runway 10/28 या धावपट्टीचे काम १५ जूनपासून सुरू झाल्यामुळे, नाशिकदिल्ली उड्डाणे आठवड्यातून फक्त तीन दिवस मर्यादित करण्यात आली होती. मात्र आता हे काम पूर्ण झाल्याने १६ सप्टेंबरपासून नियमित सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी १२ जुलै २०२५ रोजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किणेजारापू राममोहन नायडू यांना पत्र लिहून सेवा पुन्हा दररोज सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आता नाशिकदिल्ली विमानसेवा दिवसातून दोन वेळा उपलब्ध राहणार आहे.

व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी दिलासा

१८० आसनांच्या इंडिगो विमानांद्वारे ही सेवा चालवली जाणार असून, सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एक उड्डाण असे वेळापत्रक निश्चित केले आहे. यामुळे नाशिकमधील व्यावसायिक, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांना एका दिवसात दिल्लीतील कामे उरकून पुन्हा नाशिकला परत येणे शक्य होईल.

नाशिकमधून उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटन कंपन्यांसाठीही ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तर भारतातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना या विमानसेवेचा मोठा फायदा होईल.

नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वेगाने वाढतेय

सध्या नाशिक विमानतळावरून नवी दिल्ली, गोवा, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता २८ ऑक्टोबरपासून नाशिकइंदूरजयपूर आणि नाशिकहैदराबाद या मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याची घोषणाही इंडिगोकडून करण्यात आली आहे.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, “नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यामुळे येथे अधिक विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि विमानतळ सुसज्ज करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.”

उद्योजकांची प्रतिक्रिया

Manish Raval

मनीष रावल, उद्योजक व उपाध्यक्ष (NIMA) तसेच विमान वाहतूक समितीचे अध्यक्ष, MACCIA महाराष्ट्र आणि AIMA, म्हणाले या नव्या विमानसेवेने नाशिकची व्यवसाय, गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्राशी जोडणी आणखी मजबूत होईल. रोजगारनिर्मितीतही भर पडेल आणि नाशिकच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!