दिल्ली स्फोट : लालकिल्ल्याजवळचा स्फोट नव्हे, दहशतवादी हल्ल्याची शक्यता!
महाराष्ट्रात हायअलर्ट, मुंबईत सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली, दि. १० नोव्हेंबर २०२५ – Delhi Blast देशाच्या राजधानीत लालकिल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने दिल्ली हादरली आहे. संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एका व्हॅनमध्ये झालेल्या या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये पोलिसांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे.
🔹 दहशतवादी कटाची शक्यता (Delhi Blast )
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा केवळ अपघाती स्फोट नसून नियोजित दहशतवादी कट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. व्हॅनमध्ये ठेवलेले स्फोटक अत्याधुनिक प्रकारचे असल्याचा अंदाज तपास संस्थांकडून वर्तवला जात आहे.
🔹 घटनास्थळी गोंधळ, अग्निशामक दल व एनआयएचा तातडीचा हस्तक्षेप
स्फोट झाल्यानंतर परिसरात अफरातफर माजली. अनेक वाहने जळून खाक झाली, तर काहींच्या आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. अग्निशामक दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. एनआयए (NIA), एनएसजी (NSG), आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळ सील करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
🔹 महाराष्ट्रात अलर्ट, मुंबईत कडक सुरक्षा
दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मेट्रो स्टेशन, तटीय भाग आणि धार्मिक स्थळांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, “क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) अलर्टवर आहे, तर सर्व पोलीस ठाण्यांना संवेदनशील भागात सतत गस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
🔹 ऑनलाइन व सोशल मीडियावर नजर
गुप्तचर यंत्रणांना ऑनलाइन चॅट्स, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शहरातील हॉटेल्स, लॉज आणि भाड्याने देण्यात येणाऱ्या घरांची तपासणी करण्यात येत आहे. नवीन भाडेकरू व बाहेरील पाहुण्यांची ओळखपत्र तपासली जात आहे.
🔹 वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “स्फोट झालेली गाडी हळूहळू पुढे जात असताना सिग्नलला थांबली होती. त्या क्षणी अचानक स्फोट झाला आणि त्याचा परिणाम इतका जबरदस्त होता की आसपासच्या आठ ते दहा गाड्या जळून खाक झाल्या. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले होते. प्राथमिक तपासानुसार हा हल्ला अत्यंत नियोजित स्वरूपाचा असू शकतो.”
🔹 नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


