
मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२५ – Ajit Pawar party updates राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये सुरु असलेल्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. या राजकीय संघर्षानंतर रुपाली ठोंबरे यांना पक्षातून साईडलाईन करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत रुपाली ठोंबरे यांचे नाव नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीतूनही वगळण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
(Ajit Pawar party updates) महिला नेत्यांमध्ये मंत्री अदिती तटकरे, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, प्रतिभा शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला गटात आता कोणाला महत्त्व दिले जात आहे, हे स्पष्ट झाले आहे.
पक्षाने अलीकडेच ठोंबरे यांना त्यांच्या वक्तव्यांबद्दल नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि आपली भूमिका स्पष्ट करण्याचे सांगितले होते. मात्र, या भेटीनंतरही त्यांना स्टार प्रचारक यादीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, “रुपाली ठोंबरे यांचा पक्षातील प्रभाव कमी होत चालला असून, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील ‘लाडकी बहीण’ आता रुपाली चाकणकर ठरली आहे.”आगामी निवडणुकीत हा अंतर्गत वाद पक्षासाठी किती नुकसानदायक ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


